पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा हटविल्याच्या निषेधार्थ भाजयुमो आक्रमक
राज ठाकरे यांनी आपल्या मुलाला संविधानाचा धडा शिकवावा : भाजयुमो
मुंबई: पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांची प्रतिमा हटविल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने आज राजगड येथील मनसे कार्यालयाबाहेर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार श्री. अमित साटम जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो महाराष्ट्र अध्यक्ष श्री. कृष्णराज महाडीक आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान भाजयुमो कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांची प्रतिमा हटविल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनाच्या माध्यमातून भाजयुमोने स्पष्ट केले की, पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा आणि संवैधानिक संस्थांचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ दिला जाणार नाही. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही कृतीचा लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने तीव्र निषेध करण्यात येईल.
यावेळी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. कृष्णराज महाडीक म्हणाले, “राज ठाकरे यांनी राजकारणावर मोठमोठी भाषणे करण्यापूर्वी आपल्या मुलाला संविधान, लोकशाही आणि सार्वजनिक संस्थांचा सन्मान करण्याचा धडा शिकवावा. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. येथे कायदा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचा अवमान करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे.”
भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी म्हणाले, “देशाचे पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधी आणि देशाचा गौरव आहेत. त्यांच्या पदाचा अनादर करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांचा अनादर करणे होय. अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून पंतप्रधान जी यांच्या प्रतिमेबाबत करण्यात आलेली कृती ही केवळ एका प्रतिमेचा विषय नसून सार्वजनिक संस्थांची मर्यादा आणि संवैधानिक पदाच्या सन्मानाचा प्रश्न आहे.”
भाजयुमो मुंबई स्पष्ट करू इच्छिते की, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचा अवमान असो किंवा पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा कोणताही प्रयत्न असो, मुंबईचा युवा वर्ग ते शांतपणे सहन करणार नाही. अशा घटनांविरोधात भाजयुमो लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने ठामपणे आवाज उठवत राहील.
महाराष्ट्रातील युवा शक्तीला उकसवणुकीचे आणि अहंकाराचे राजकारण नको आहे; तर संविधान, विकास आणि राष्ट्रहिताच्या राजकारणाची गरज आहे.

