प्रत्येक देवस्थानाला वैयक्तिक रु. १२ हजारांची देणगी; लेण्याद्री व पालीतील प्रश्नांसाठी करणार पाठपुरावा
पुणे, : शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या आणि माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २७ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अष्टविनायक दर्शन व विकासकामांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मोरगावचा श्री मयूरेश्वर, सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, पालीचा श्री बल्लाळेश्वर, महडचा श्री वरदविनायक, थेऊरचा श्री चिंतामणी, लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज, ओझरचा श्री विघ्नेश्वर आणि रांजणगावचा श्री महागणपती यांचे दर्शन श्लोकातील क्रमाने घेतले. पुन्हा मोरगाव येथे दर्शन घेऊन यात्रेची सांगता करण्यात आली.
दौऱ्यात डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्येक देवस्थानातील विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंदिर परिसरातील रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, महिला स्वच्छतागृहे, पार्किंग, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा आणि सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेतली. प्रत्येक देवस्थानाच्या धार्मिक व सामाजिक कार्यासाठी त्यांनी वैयक्तिकरित्या प्रत्येकी रु. १२ हजार, अशी एकूण रु. ९६ हजारांची देणगी दिली.
मागील दौऱ्याच्या तुलनेत अष्टविनायक देवस्थानांना जोडणारे बहुतांश रस्ते चांगले झाले असून प्रवास अधिक सुकर झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, महिला भाविक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी प्रमुख मार्गांवर नियमित अंतराने स्वतंत्र आणि सुरक्षित महिला स्वच्छतागृहे उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या स्वच्छतागृहांमध्ये पाणी, वीज आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी तत्कालीन विधान परिषद उपसभापती म्हणून ११ ते १३ डिसेंबर २०२१ या कालावधीत अष्टविनायक दौरा केला होता. त्यानंतर १० जानेवारी २०२२ रोजी घेतलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत विकासकामे कालमर्यादेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे, रस्त्यांची दुरुस्ती, दोन तासांच्या प्रवासाच्या अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, दिशादर्शक फलक, स्वच्छता तसेच मंदिरांजवळील तलावांचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
त्यानंतर जुलै २०२४ मध्येही डॉ. गोऱ्हे यांच्या दालनात अष्टविनायक देवस्थानांच्या प्रश्नांवर बैठक झाली होती. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग, आरोग्य सुविधा, अंतर्गत रस्ते, दळणवळण, मंदिरातील दागिने व मालमत्तेची सुरक्षा तसेच विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळविण्याबाबत त्यांनी निर्देश दिले होते. सध्याच्या दौऱ्यात या सूचनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष मागोवा घेण्यात आला.
लेण्याद्रीसाठी स्वतंत्र पाठपुरावा
अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धार आराखड्यात लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मज मंदिराचा समावेश झालेला नसल्याची बाब मंदिर समितीने डॉ. गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिली. मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने जीर्णोद्धारासाठी निधी नाकारण्यात आल्याचे समितीने सांगितले. मात्र, हा निर्णय घेताना मंदिर समितीला विश्वासात घेण्यात आले नसल्याची भावनाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
“ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप आणि पुरातत्त्व विभागाचे नियम जपणे आवश्यक आहे. मात्र, मंदिर समितीला विश्वासात घेऊन भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संरक्षित मंदिराला धक्का न लावता पायथ्याचा परिसर, स्वच्छता, पिण्याचे पाणी, विश्रांतीची जागा, महिला स्वच्छतागृहे आणि परिसर सुशोभीकरणासाठी स्वतंत्र निधी मिळविण्याचा पाठपुरावा केला जाईल,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पाली येथे तात्पुरत्या ताडपत्रीची वैयक्तिक व्यवस्था
पाली परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात जाताना पावसात भिजावे लागते, ही अडचण देवस्थान समितीने मांडली. भाविकांची तातडीची गैरसोय दूर करण्यासाठी मंदिर समितीशी समन्वय साधून तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्रीचे आच्छादन करण्याची व्यवस्था डॉ. गोऱ्हे वैयक्तिकरित्या करणार आहेत. या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शासनाकडे स्वतंत्र प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल.
ओझर येथे मंदिराच्या अंतर्गत भागातील कामे पुरातत्त्व विभागाच्या सूचनांनुसार झाल्याचे दिसून आले. तसेच येडगाव जलाशयात नौकाविहारास शासनाने दिलेल्या परवानगीमुळे भाविकांना कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेता येणार असून स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
दौऱ्यादरम्यान विविध देवस्थान समित्यांनी डॉ. गोऱ्हे यांनी उपसभापती असताना वेळोवेळी बैठका घेऊन मंदिरांच्या समस्या समजून घेतल्याबद्दल आणि त्या शासनाकडे सातत्याने मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. समित्यांनी मांडलेल्या प्रलंबित प्रश्नांचा संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून कामांना गती देण्याची ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
“हा दौरा केवळ दर्शनाचा नव्हता. उपसभापती म्हणून पूर्वी दिलेल्या सूचनांची किती अंमलबजावणी झाली, कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणते प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत, याचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचा हा प्रयत्न होता. अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा श्रद्धा, ऐतिहासिक वारसा, महिला सुविधा आणि पर्यटनविकास या दृष्टीने समन्वित विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

