पुणे जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीत ६२.१३ लाख मतदार; २८.६६ लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’

Date:

२१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप यादी प्रसिद्ध; १३.३२ लाख प्रकरणांवर होणार सुनावणी, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी रविवारी (दि. ३१) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आली. विशेष सखोल पुनरीक्षण सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार नोंदणीकृत होते. प्रारूप यादीनुसार आता ६२ लाख १३ हजार ६९२ मतदारांची नोंद झाली आहे.

या प्रारूप यादीमध्ये ३१ लाख ५१ हजार २९७ पुरुष, ३० लाख ६२ हजार १२ महिला आणि ३८३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत सातने वाढ झाली असून ती आता ८ हजार ४२४ झाली आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

२८.६६ लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’

एएसडीडी यादीनुसार पुणे जिल्ह्यात २८ लाख ६६ हजार ४८१ गणना अर्ज ‘अनकलेक्टेबल’ स्वरूपात नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये १ लाख ४३ हजार ९७५ दुबार मतदार, ३ लाख १२ हजार ४८ मयत, १७ लाख ८३ हजार ५८ अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ स्थलांतरित, तर ३६ हजार ३६२ मतदार इतर कारणांमुळे या श्रेणीत आहेत.

या मोठ्या संख्येमुळे अंतिम मतदार यादी तयार होण्यापूर्वी दावे, हरकती आणि सुनावण्यांच्या प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

१३.३२ लाख प्रकरणांवर सुनावणी

प्रारूप मतदार यादीतील मतदारांच्या तपशिलात तफावत आढळलेल्या तसेच सन २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग न झालेल्या मतदारांच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ५ लाख ७७ हजार ८२१ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आहे, तर ७ लाख ५४ हजार ५९७ मतदारांचे २००२ च्या यादीशी मॅपिंग झालेले नाही. अशा एकूण १३ लाख ३२ हजार ४१८ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

संबंधित यादी भागाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या स्तरावर ही सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीमध्ये ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

नाव नसेल तर प्रपत्र क्रमांक ६

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना प्रपत्र क्रमांक ६ भरून नव्याने मतदार नोंदणी करता येणार आहे. एखाद्या नावाबाबत आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७, तर ईपीक कार्ड अथवा मतदार नोंदीतील दुरुस्तीसाठी प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल.

दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

दावे व हरकतींवर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कार्यवाही करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यात ८,४२४ मतदान केंद्रे

जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता ८ हजार ४२४ झाली आहे. त्यामध्ये जुन्नर ३५६, आंबेगाव ३४४, खेड-आळंदी ३९३, शिरूर ४५९, दौंड ३१५, इंदापूर ३३९, बारामती ३८८, पुरंदर ४१३, भोर ५६७, मावळ ४०२, चिंचवड ५६०, पिंपरी ३९७, भोसरी ४९१, वडगाव शेरी ४३८, शिवाजीनगर २६६, कोथरूड ३८७, खडकवासला ५०२, पर्वती ३४४, हडपसर ५२५, पुणे कॅन्टोन्मेंट २७० आणि कसबा पेठ २६८ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ, ECINET आणि Voter Service Portalवरही मतदारांना यादी पाहता येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजपच्या मनुवादी वृत्तीचा मुंबई युवा काँग्रेसकडून तीव्र निषेध

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या भाजप-आरएसएसच्या...

गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त

पुणे, दि .३१ : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश

पुणे, दि. ३१ : आगामी गणेशोत्सव व विविध धार्मिक...

डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन जाहीर

पुणे, दि.३१: डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, विश्रामबाग, चंदननगर,...