बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये 2.5 लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग
पुणे : लहान बालकांचा सर्वांगीण विकास हा केवळ स्वतंत्र बालकल्याणाचा विषय न ठेवता शहरी नियोजन, सार्वजनिक जागा, रस्ते आणि महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाचा भाग बनविण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत सादरीकरण करण्यात आले. पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे ही कार्यशाळा झाली.
महाराष्ट्रातील विविध भागांतील वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि बालविकास क्षेत्रातील प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि मेघालयचे प्रधान सचिव संपत कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेत बालकांच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस, पोषण, एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS), स्थानिक पातळीवरील संगोपन आणि पोषण व्यवस्था, आदिवासी भागातील बालविकास तसेच जिल्हास्तरीय नवकल्पनांचा विस्तार अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
‘अर्बन95’मधील पुण्याचा प्रवास
‘अर्बन95 – विकासाच्या केंद्रस्थानी बालकांना ठेवत पायाभूत सुविधांची निर्मिती’ या विशेष सत्रात पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी पुण्याच्या ‘अर्बन95’ उपक्रमाचे सादरीकरण केले.
पुणे महापालिका 2018 पासून 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके आणि त्यांच्या पालकांच्या गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक जागा, नागरी सुविधा आणि रस्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. बालक आणि पालकांच्या गरजा महापालिकेच्या नियमित नियोजनाचा भाग बनविण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांमध्ये खेळ, बालकांचा सुरुवातीचा विकास, सुरक्षित प्रवास आणि पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी जागा विकसित करण्यात आल्या आहेत. स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून समुदायाचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत.
‘पुणे किड्स फेस्टिव्हल’ला मोठा प्रतिसाद
महापालिकेच्या माहितीनुसार, ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये 2.5 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये एक लाखांहून अधिक बालके आणि सुमारे 1.38 लाख पालकांचा समावेश होता.
बालक-केंद्रित दृष्टिकोन महापालिकेच्या व्यवस्थेत कायमस्वरूपी रुजविण्यासाठी बालविकास अधिकारी आणि बालस्नेही शहर कक्ष अशा स्वतंत्र यंत्रणाही निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद तसेच बालक व पालकस्नेही रचनेसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पाठबळ देण्यात आले आहे.
महापालिकेच्या मते, ‘अर्बन95’चा हा प्रवास पुण्याला ‘काळजीवाहू शहर’ (City of Care) म्हणून विकसित करण्याच्या संकल्पनेचा महत्त्वाचा भाग आहे. शहरी पायाभूत सुविधा केवळ भौतिक सुविधांपुरत्या मर्यादित न राहता बालकांचे आरोग्य, विकास, सुरक्षितता आणि सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढविणाऱ्या असाव्यात, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.

