२०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास
पुणे: शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर (मान ते डिस्ट्रिक्ट कोर्ट) मेट्रो लाईन ३ च्या कामाची पाहणी आज शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

या वेळी टाटा आणि सिमेन्स कंपनीचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते. पुणेकरांचा महत्त्वाचा वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी २०२२ मध्ये सुरू झालेल्या या २३ स्टेशनच्या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मान ते राम नगर दरम्यानची १२ स्टेशन्स पूर्णपणे तयार झाली आहेत आणि मतदारसंघातील एकूण ७ स्टेशनपैकी (आयसर, सकाळ नगर, युनिव्हर्सिटी, भोसले नगर, मॉडेल कॉलनी, शिमला ऑफिस आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट) ५ स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पुढील २ ते ३ महिन्यांत आवश्यक मंजुऱ्या (क्लिअरन्स) मिळतील अशी अपेक्षा असून, २०२६ मध्ये मान ते थेट डिस्ट्रिक्ट कोर्ट (शिवाजीनगर) असा सलग प्रवास पुणेकरांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे अशी माहिती शिरोळे यांनी दिल्ली.
पुण्याच्या प्रवेशद्वारावर गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीतून या प्रकल्पामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहे. २०२६ मध्ये ही मेट्रो सेवा पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा आम्हाला विश्वास आहे, असे शिरोळे म्हणाले

