सर्वधर्मीय सण-उत्सव आणि महापुरुषांच्या जयंती मिरवणुकांसाठी समान नियमांची मागणी; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कर्णकर्कश साउंडविरोधी भूमिकेचे स्वागत
पुणे : गणेशोत्सव, दहीहंडी तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक मिरवणुकांमध्ये होणाऱ्या कर्णकर्कश ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा स्पीकर आणि लेझर लाईटवर शंभर टक्के बंदी घालावी, तर DJचा आवाज शासनाने निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त असू नये, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्णकर्कश साउंडविरोधात घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करतानाच ही कारवाई कोणत्याही एका सणापुरती मर्यादित न ठेवता सर्व धर्मांच्या सण-उत्सवांमध्ये तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये समान पद्धतीने लागू केली पाहिजे, अशी अपेक्षाही खर्डेकर यांनी व्यक्त केली.
खर्डेकर यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या
“मी अविवेकाची काजळी। फेडूनी विवेक दीप उजळीं। तैं योगियां पाहे दिवाळी। निरंतर॥”
या ओळींचा संदर्भ देत आता सण-उत्सव साजरे करतानाही समाजाने विवेकाची कास धरण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
‘सण दणक्यात साजरे करा; पण गैरप्रकारांना आळा हवा’
गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका असोत, ईदच्या मिरवणुका असोत किंवा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका असोत, अनेक ठिकाणी प्रचंड आवाजातील DJ हा मिरवणुकीचा अविभाज्य भाग बनत चालल्याची खंत खर्डेकर यांनी व्यक्त केली.
कर्णकर्कश आवाजात नृत्य करणे आणि त्यालाच निर्बंधमुक्त उत्सव म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. समाजातील काही घटकांना अशा प्रकारचे साउंड आवडत असले तरी वृद्ध, रुग्ण, लहान मुले आणि शांतता अपेक्षित असणारा मोठा सामान्य नागरिकवर्गही समाजाचाच भाग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘लोकानुनय करताना सामान्य नागरिकांचाही विचार करा’
राजकीय नेते आणि प्रशासनाने केवळ गर्दी किंवा कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा विचार न करता सामान्य नागरिकांवर होणाऱ्या परिणामाचाही विचार करायला हवा, अशी भूमिका खर्डेकर यांनी मांडली.
“वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि रुग्णांवर प्रचंड आवाजाचा काय परिणाम होत असेल, याचाही विचार होणे गरजेचे आहे. तेही याच समाजाचे घटक आहेत,” असे त्यांनी म्हटले.
तरुणाई वाहवत जात असेल तर त्यांना योग्य दिशा दाखविण्याची जबाबदारी राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असले तरी प्रत्येक वेळी गर्दीची मानसिकता योग्यच असेल असे मानता येणार नाही, असेही खर्डेकर यांनी नमूद केले.
सर्वधर्मीय उत्सवांसाठी समान नियम हवेत
पोलिस आयुक्तांनी कर्णकर्कश ध्वनीप्रदूषणाविरोधात घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करताना खर्डेकर यांनी ‘समान न्याय’ या मुद्द्यावर भर दिला.
गणेशोत्सवापुरते निर्बंध न ठेवता दहीहंडी, ईद, नवरात्रोत्सव, धार्मिक मिरवणुका तसेच महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुकांसाठीही ध्वनी आणि लेझर लाईटच्या वापराचे समान नियम असावेत, अशी त्यांची मागणी आहे.
पोलिस प्रशासनाने याबाबत कोणत्याही दबावाला बळी न पडता ठाम भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘दहीहंडी हा ट्रेलर ठरेल’
दहीहंडी उत्सवात प्रशासन ध्वनिप्रदूषणाबाबत किती कठोरपणे नियमांची अंमलबजावणी करते, यावर आगामी गणेशोत्सवातील परिस्थितीचे चित्र स्पष्ट होईल, असे खर्डेकर यांनी म्हटले.
“दहीहंडी हा एकप्रकारे ट्रेलर असेल. त्यातून गणेशोत्सवात नियमांची अंमलबजावणी कशी होणार याची प्रचिती येईल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘मी स्वतः गणेश मंडळांशी संबंधित; पण गैरप्रकारांना विरोध’
आपली भूमिका हिंदू सणांना विरोध करण्याची नसल्याचेही खर्डेकर यांनी स्पष्ट केले. आपण स्वतः अनेक गणेश मंडळांशी संबंधित असून कोथरूड नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
“गणेशोत्सव दणक्यात साजरा झालाच पाहिजे; मात्र त्यातील गैरप्रकारही टाळलेच पाहिजेत,” अशी आपली आग्रही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या नागपंचमीच्या काही मिरवणुकांच्या सोशल मीडिया रील्स पाहिल्यानंतर आगामी काळात अशा प्रकारांचा विस्तार होण्याची चिंता वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले.
विवेकी नागरिकांनी पुढे यावे
ध्वनिप्रदूषण आणि उत्सवांतील गैरप्रकारांविरोधात केवळ प्रशासनावर जबाबदारी न टाकता समाजातील विवेकी नागरिकांनीही एकत्र येऊन आवाज उठवावा, असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले.
“सण-उत्सव उत्साहात आणि आनंदात साजरे व्हावेत; मात्र त्यासाठी इतर नागरिकांना त्रास होईल अशी पद्धत स्वीकारणे योग्य नाही. सामाजिक शांतता आणि सार्वजनिक हित जपणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे,” असेही खर्डेकर यांनी म्हटले.
— संदीप खर्डेकर, अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन

