पुणे महापालिकेतील ३३ वर्षांच्या प्रशासकीय अनुभवाची दखल; दोन वर्षांसाठी नियुक्ती
पुणे : भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत असलेल्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी (उपायुक्त) नितीन बाजीराव केंजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंजळे यांची नियुक्ती २७ मार्च २०२६ ते २६ मार्च २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली. संघटित, असंघटित तसेच ग्रामीण भागातील कामगारांना कामगार हक्क, सामाजिक-आर्थिक प्रश्न आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत शिक्षण व प्रशिक्षण देणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
शिपाई पदापासून मुख्य कामगार अधिकाऱ्यांपर्यंतचा प्रवास
नितीन केंजळे यांना पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा सुमारे ३३ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी १९९३ मध्ये पुणे महापालिकेत शिपाई पदापासून सेवेला सुरुवात केली.
त्यानंतर विविध विभागीय परीक्षा देत त्यांनी कनिष्ठ श्रेणी लेखनिक, लघुटंकलेखक, कामगार अधिकारी अशा विविध पदांवर काम केले. सध्या ते पुणे महानगरपालिकेत मुख्य कामगार अधिकारी (उपायुक्त) म्हणून कार्यरत आहेत.
महापालिकेतील कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे तसेच मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या नियंत्रणाखाली देशभरात सध्या ५० प्रादेशिक संचालनालये कार्यरत असून, मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्कर्स एज्युकेशन या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेचाही त्यात समावेश आहे.
केंजळे यांच्या नियुक्तीमुळे पुणे विभागातील संघटित आणि असंघटित कामगारांसाठी प्रशिक्षण, हक्कांविषयी जनजागृती आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

