पुणे-पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. या अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 6 तरुण कारने साताऱ्याच्या दिशेने जात होते. शिरवळ परिसरात आले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार महामार्गावरील दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. ही धडक एवढी तीव्र होती की कारचा चक्काचूर झाला.
या अपघातात वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलिस आणि शिरवळ पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सातारा महामार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात:मावळ परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर
Date:

