सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेला चाळणी लावा
- लोककलावंतांतर्फे शासनाला विनंती
मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2026
सध्या विविध लोककलांचे महोत्सव सुरु असून यापुढील काळात राज्याच्या सर्व विभागात भव्य स्वरुपात लोककला महोत्सव आयोजित करण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केली.
अखिल भारतीय लोककलावंत, मराठी तमाशा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा सन्मान आज सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आला. .तर मंत्री शेलार यांचाही लोककलावंताच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला. लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे यांच्या उपस्थितीत व तमाशा परिषद अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला वसंतराव जगताप, खंडूराज गायकवाड, गणेश चंदनशिवे, आविष्कार मुळे, शेषराव गोपाळ, सुनील वाडेकर यांच्यासह राज्यभरातून विविध कला सादर करणारे लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तमाशा परिषदे तर्फे पठ्ठेबापूराव यांच्या नावे मरणोत्तर पुरस्कार योजना सुरु करुन लोककलेतील दिवंगत कलावंताना मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावे, विठाबाई नारायणगावकर स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावे, पेंशन योजनेला चाळणी लावावी कारण या योजनेत काही बोगस कलावंत घुसले आहेत. त्यासाठी शासनाने एक समिती गठीत करुन चाळणी लावावी, ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीतबारी याबाबत नियुक्त अभ्यास गटाच्या अहवालानुसार शासन निर्णय काढण्यात यावा, बुलढाणा व काही जिल्ह्यात तमाशाला पोलिसांकडून परवानगी नाकारली जाते त्याबद्दल पोलीसांना सूचना देण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन मंत्री आशिष शेलार यांना देण्यात आले त्यावर येत्या पंधरा दिवसात बैठक करुन चर्चा करुन योग्य ते निर्णय करु, असे मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील लोककला व लोककलावंत यांच्या कार्याचा गौरव केला.

