मुठा नदीतील विसर्ग १६ हजार २४७ क्युसेक्सपर्यंत वाढवणार
पुणे, दि. ३१ जुलै : खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये शुक्रवारी सकाळी सहा वाजता एकूण २७.७६ टीएमसी म्हणजेच ९५.२२ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला. गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत २५.४८ टीएमसी म्हणजे ८७.४१ टक्के पाणीसाठा होता.
त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत २.२८ टीएमसी अधिक पाणी, तर टक्केवारीनुसार ७.८१ टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही स्थिती दिलासादायक मानली जात आहे.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणात १.९७ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा आहे. पानशेत धरणात १०.४७ टीएमसी म्हणजे ९८.३८ टक्के, वरसगावमध्ये १२.२१ टीएमसी म्हणजे ९५.२८ टक्के, तर टेमघर धरणात ३.०९ टीएमसी म्हणजे ८३.३६ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला.
चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, सकाळच्या सहा तासांतील नोंदीनुसार खडकवासला परिसरात १७ मिलिमीटर, पानशेतमध्ये २६ मिलिमीटर, वरसगावमध्ये २४ मिलिमीटर आणि टेमघर परिसरात ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस खडकवासला येथे ५८५ मिलिमीटर, पानशेतमध्ये १ हजार ६६९ मिलिमीटर, वरसगावमध्ये १ हजार ५८८ मिलिमीटर आणि टेमघरमध्ये २ हजार ३१३ मिलिमीटर झाला आहे. संलग्न पर्जन्यमान तक्त्यातही हीच नोंद करण्यात आली आहे.
चारही धरणांमध्ये सकाळी एकूण ७८३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू होती. यामध्ये खडकवासला धरणात २६३, पानशेतमध्ये २००, वरसगावमध्ये २५८ आणि टेमघरमध्ये ६२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक नोंदविण्यात आली.
खडकवासल्यातून विसर्गात मोठी वाढ
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन मुठा नदीतील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे. सकाळी धरणाच्या सांडव्यावरून ५ हजार ७८३ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. सकाळी नऊ वाजता तो ७ हजार ९२५ क्युसेक्स करण्यात आला.
पाण्याची वाढती आवक पाहता सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी हा विसर्ग १६ हजार २४७ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली. खडकवासला धरणातून आतापर्यंत सांडव्याद्वारे एकूण ४.०९ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
पानशेत धरणही ९९ टक्क्यांच्या उंबरठ्यावर
पानशेत धरणातील पाणीसाठा सकाळी नऊ वाजता ९८.९७ टक्क्यांवर पोहोचला. धरणाच्या जलविद्युत गृहातून ६०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सांडव्याद्वारे सुरू असलेला ३ हजार १९६ क्युसेक्स विसर्ग सकाळी १० वाजता ४ हजार ९७५ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
पावसाचे प्रमाण आणि धरणांमध्ये होणारी आवक लक्षात घेऊन विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीतील पंप, शेतीची अवजारे, साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

