धमकी देणारा तो पोलिस निलंबित
मुंबई- तरुणांना खिशात ड्रग्ज टाकून खोट्या गुन्हांमध्ये अडकवण्याची धमकी देणारा प्रकार काँग्रेसने समोर आणला आहे. त्याचा एक व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी पोस्ट केलाय. मुंबई काँग्रेसनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तरुणांना इकडे पुन्हा आल्यास खिशात ड्रग्ज टाकून आत टाकेन, अशी धमकी एक पोलिस अधिकारी देताना दिसतोय.
‘मुलांना धमकी देणारे पोलिस ड्रग्ज सप्लायर आहेत का,’ असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. एकीकडे नवी दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणात आंदोलन करणारे कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि तरुणांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध होतोय. त्यातच हा नवा प्रकार समोर आला आहे.
या व्हायरल व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पवन सांगळे असे या पोलिसाचे नाव असून तो सायन पोलिस स्टेशनला ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. तरुणांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची थेट धमकी देणाऱ्या या पवन सांगळेला आता मुंबई पोलिसांनी निलंबित केले आहे.
काँग्रेसने समोर आणलेला व्हिडिओ नेमका काय?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी एका पोलिसाचा तरुणांना धमकी देणारा व्हिडिओ एक्स या सोशल माध्यमावर पोस्ट केलाय. त्या व्हिडिओमध्ये एका गाडीत काही तरुण आणि पोलिस बसलेला दिसतो आहे. त्यात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होतो. त्यातला पोलिस म्हणतो की, ‘इकडे वापस मिळालास तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल.’ त्याला उत्तर देताना तरुण तरुण ‘शप्पथ. बिल्कुल नाही. बिल्कुल नाही’, असे घाबरून म्हणतो. त्यावर पुन्हा पोलिस ‘मी डायरेक्ट 50 50 ग्रॅम पावडर घालेन खिशात. मग गेलास…तुमच्यामुळे आम्हाला त्रास आहे,’ अशी धमकी देतो.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यांनी एक्स समाज माध्यमावर हा व्हिडिओ पोस्ट करून लिहिले आहे की, “खलरक्षणार्थ, सदनिग्रणार्थ ” महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री श्री श्री #पांडू_हवालदार यांचा संदेश “फिर मेरे जैसा कोई बेकार आदमी नही”. किती नीचपणा सुरू आहे, पाहा! आंदोलनात सहभागी झालात तर “तुमच्या खिशात ५० ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू,” अशा धमक्या पोलिसांकडून दिल्या जात असल्याचे आरोप होत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाणारी ही दडपशाही लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.
खाकी वर्दीतील गुंड याचे हे उदाहरण बघा..!
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, ‘तरुणाई न्यायासाठी, सत्यासाठी लढतेय. या तरुणाईला पोलीस खिशात ड्रग्स टाकून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत. पोलिसांची इतकी क्रूर बुद्धी तर इंग्रजांच्या राज्यातही नव्हती, इतके क्रूर हे पोलीस भाजपाच्या राज्यात झाले आहेत. खरंतर विद्यार्थ्यांच्या खिशात टाकण्यासाठी या पोलिसांकडे ड्रग्स येतात कुठून याची चौकशी झाली पाहिजे..तरुणांना धमकी देऊ नका… महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…पण आता पोलिसांपासूनच सामान्य नागरिकांचे रक्षण करण्याची वेळ आली आहे!
ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे!
काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त केलाय. हा व्हिडओ पोस्ट करून त्या लिहितात की, ‘Is this the modus operandi of Mumbai Police and NCB? Is this how those infamous NCB cases were filed? Policeman threatens students he will plant powder in their pockets! NEET पेपरफुटीविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून धमकावलं जातंय “पुन्हा दिसलास तर खिशात पावडर ठेवून केस टाकेन… माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही!” ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे!’
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये ‘या पावडर छाप पोलिसावर कारवाई होणार,’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तसेच ‘हे असले थेरं करून तुमचे पोलिस मुलांवर दडपशाही करत आहेत! कोणत्या नियमात बसतं हे असलं वागणं?,’ असा प्रश्नही विचारला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘ह्याच्याकडे 50 ग्राम पाउडर कुठून आली ? हा ड्रग पेडलर आहे क ? हे किती जणांना खोट्या गुन्ह्यात फसवत असतील ?’, असा सवाल सोशल मीडियावर पोस्ट करून उपस्थित केलाय.

