‘पैशांअभावी शिक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती आता समाजात नाही’-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ; ३०० गरजू विद्यार्थ्यांना ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’

Date:

पुणे,: आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी केवळ पैशांअभावी शिक्षण मिळू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या समाजात नाही. मात्र, मदतीसाठी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कोणताही संकोच न बाळगता आपली वस्तुस्थिती इतरांना सांगितली पाहिजे. अडचण सांगितल्याशिवाय मदत मिळणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि अभय भुतडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एस. पी. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, खजिनदार प्रसाद पानसे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेवक अमर आवळे, नगरसेविका प्रियांका शेंडगे व स्मिता वस्ते, माजी नगरसेविका मनीषा घाटे, तसेच विशाल पवार, पुष्कर तुळजापूरकर, प्रशांत सुर्वे, राजेंद्र पाटे, अनिल पाटील, सुधीर शिंदे आणि कमलेश महाले उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून धीरज घाटे यांनी आतापर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. उद्योजक अभय भुतडा यांनी केवळ आर्थिक प्रगती न साधता सामाजिक कार्यातही योगदान देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी गरिबीचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे.’’

‘‘मी दरवर्षी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत करतो. त्यामध्ये प्रामुख्याने मुलींना मदत केली जाते. कारण मुलगी शिकल्यास ती संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावते. एकल महिला पालकांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकारकडून नियोजन सुरू असून, त्याचा मी आढावा घेत आहे. माझ्या मतदारसंघातही यासाठी पुढाकार घेतला आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले.

मुलांचे शरीर त्यांच्या वयाच्या तुलनेत सुदृढ दिसत नसल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी विशेष अभियान हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके म्हणाले, ‘‘समाजात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात; मात्र काही कार्यक्रम समाजाला नवी दिशा देणारे असतात. मदत करणारे अनेक दानशूर लोक समाजात आहेत. त्यांची मदत योग्य आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक कुटुंबाची प्रगती झाली तर समाजाची आणि पर्यायाने देशाची प्रगती होईल.’’

धीरज घाटे म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील ३०० विद्यार्थ्यांना ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांसाठी आयुष्यभर कार्य करण्याचा संकल्प केला आहे. परिसरातील एकही विद्यार्थी केवळ फीअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अभय भुतडा फाउंडेशनच्या सहकार्याने आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी आर्थिक मदत दिली जात आहे.’’

नगरसेवक अमर आवळे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे. मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलो असून, शिक्षण घेताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला. संघ आणि भाजपने दिलेल्या पाठबळामुळे आज मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यापुढेही गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करीन.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्राट लाड यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासला धरण समूहात सकाळी 6 वाजेपर्यंत 21.02 टीएमसी म्हणजे 72.12% पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.28 टीएमसीने कमी पुणे, दि. 23...

वनराज आंदेकर हत्येचा सूड? बालाजीनगर गोळीबार प्रकरणी कृष्णा आंदेकरसह तिघांना २६ जुलैपर्यंत कोठडी

पुणे-वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर बालाजीनगर येथे कोयत्याने...