साध्या वेशात पोलीस आले
खोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मूलभूत तत्त्वे
साध्या वेशातील पोलिसांसह मोठा फौजफाटा जंतर-मंतरवर; प्रकृती खालावल्याने सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्याचा पोलिसांचा दावा
नवी दिल्ली, दि. १८ जुलै : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सलग २० दिवसांपासून उपोषण करणारे पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. व्हिडिओमध्ये साध्या वेशातील कर्मचाऱ्यांसह सुरक्षादलाचे जवान मोठ्या पांढऱ्या चादरींचा पडदा उभारून वांगचुक यांना बाहेर नेताना दिसत आहेत. ही कारवाई वांगचुक यांच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पाठिंबा देत बेमुदत उपोषण सुरू केले होते. परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित घटनांप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तसेच परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची आंदोलकांची मागणी आहे. वांगचुक यांच्या उपोषणाचा शनिवारी २१वा दिवस होता.
आंदोलकांनी वांगचुक यांना चादरीआड बळजबरीने ओढत नेल्याचा आरोप केला. मात्र दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळत, वांगचुक यांची खालावलेली प्रकृती, डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले. आंदोलनस्थळावरील काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी हटवले.
सफदरजंग रुग्णालयाच्या माहितीनुसार, दीर्घकाळ उपोषण आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे वांगचुक अशक्त झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्यांना सातत्याने वैद्यकीय निरीक्षण आणि उपचारांची आवश्यकता असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.
राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. खोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मूलभूत तत्त्वे असल्याची टीका करत, शांततापूर्ण उपोषण करणाऱ्या वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटविणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. परीक्षा पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.
वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून कारवाईतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले. वांगचुक यांना कुटुंबाच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवावे आणि त्यांच्या संमतीशिवाय कोणतेही औषध अथवा उपचार देऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली.

