मुंबई : राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) आता अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. एका डिजिटल वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी गुटखा माफियांचे बदलते जाळे, राज्यातील दूध भेसळीचे धक्कादायक वास्तव आणि कठोर कायदेशीर कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली.
मुंढे म्हणाले की, महाराष्ट्रात २०१२ पासून गुटख्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे. मात्र, माफियांनी उत्पादन केंद्रे राज्याबाहेर हलवून शेजारील राज्यांतून गुटख्याची तस्करी सुरू ठेवली आहे. त्यामुळे बंदी असूनही राज्यात गुटख्याचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, गुटखा माफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण नेटवर्क राज्याबाहेर विस्तारले. पूर्वी मोठ्या ट्रकद्वारे होणारी वाहतूक आता तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी चारचाकी वाहनांमधून केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
लहान टपऱ्यांवर कारवाई होते, पण मोठ्या कंपन्यांवर होत नाही, या प्रश्नावर उत्तर देताना मुंढे म्हणाले की, आता राज्याबाहेरून गुटखा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांनाही थेट आरोपी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.
गुटखा सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब अधोरेखित करत त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका. विष विकत घेऊ नका. मागणी थांबली तर पुरवठाही आपोआप थांबेल.”
३२ टक्के दुधाचे नमुने असुरक्षित
मुंढे यांनी राज्यातील दूध भेसळीबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार तपासण्यात आलेल्या दुधाच्या नमुन्यांपैकी सुमारे ३२ टक्के नमुने असुरक्षित आढळल्याची माहिती त्यांनी दिली. ही बाब नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भेसळखोरांना जन्मठेपेचीही तरतूद
अन्न सुरक्षा कायद्यानुसार, मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री सिद्ध झाल्यास संबंधित आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते, असा इशारा मुंढे यांनी दिला. अन्नभेसळ हा केवळ आर्थिक गुन्हा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात गुटखा माफिया आणि अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांनीही गुटखा सेवन टाळावे आणि भेसळयुक्त अन्नाबाबत सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

