मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे महापालिका व एमएमआरडीएला निर्देश
मुंबई, दि. 13 जुलै
एस. व्ही. रोडवरील सुरू असलेली मेट्रोची कामे पावसाळ्यात नागरिकांना त्रासदायक ठरू नयेत. तसेच पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली.
मेट्रोच्या कामांमुळे पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि एस. व्ही. रोडवर पाणी साचण्याच्या घटना टाळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री शेलार यांनी पाहणी दौरा केला.
पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले की, काही ठिकाणी मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या पर्जन्यजल वाहिन्यांची क्षमता १.२ मीटर इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र, महानगरपालिकेच्या निकषांनुसार किमान १.५ मीटर क्षमतेची जलनिस्सारण व्यवस्था आवश्यक असल्याने अशा सर्व ठिकाणी वाहिन्यांची क्षमता तातडीने वाढविण्याचे निर्देश ॲड. शेलार यांनी दिले.
तसेच, मेट्रोच्या कामांमुळे ज्या ठिकाणी पर्जन्यजल वाहिन्यांची कामे अपूर्ण राहिली आहेत किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत, त्या ठिकाणी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय, एस. व्ही. रोडवरील जलनिस्सारण व्यवस्थेतील सर्व ‘मिसिंग लिंक्स’, अपूर्ण गटारे, तसेच गाळ काढण्याची प्रलंबित कामे महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे निश्चित करून समन्वयाने तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका कमीत कमी राहील, असे निर्देशही मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

