ठाणे : कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू असलेली एक ४ ते ५ मजली भलीमोठी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी जागेवरच कोसळली. या दुर्घटनेचे दृश्य अत्यंत चित्तथरारक असून, इमारत कोसळतानाचा थेट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या भयानक दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही घटना कल्याण पश्चिमेकडील घोलप नगर परिसरात दुपारी २ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास घडली. येथील ‘विनायक दर्शन’ नावाच्या इमारतीचे रि-डेव्हलपमेंटसाठी टप्प्याटप्प्याने पाडकाम सुरू होते. दुपारच्या वेळी काम सुरू असतानाच अचानक इमारतीचा एक मोठा भाग थेट भर रस्त्यावर कोसळला.
या इमारतीमध्ये सध्या कोणीही वास्तव्यास नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच, इमारतीचा प्रचंड मलबा जेव्हा रस्त्यावर आला, तेव्हा सुदैवाने तिथून कोणतेही वाहन किंवा पादचारी जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.इमारत कोसळत असल्याचा भयानक आवाज होताच, बाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले. परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवण्यासाठी थेट आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा बचाव केला.

