केस कापणे, अमानवी वागणूक आणि मानसिक-शारीरिक छळ केल्याचा आरोप; कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत, सासरे विनायक राऊत, सासू शामल राऊत यांच्यासह कुटुंबातील एकूण सात जणांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून कौटुंबिक छळासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीत त्यांनी सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला आहे.
गिरीजा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, घरात त्यांच्याशी अमानवी वागणूक देण्यात आली. त्यांचे केस कापण्यात आले, तसेच काही धार्मिक-अंधश्रद्धाजन्य प्रकारांच्या नावाखाली त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून सतत टोमणे मारणे, माहेरच्या लोकांविषयी अपमानास्पद बोलणे आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार घडल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
विनायक राऊत यांच्या राजकीय दौऱ्यांदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, या कारणाने काही औषधे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता, असा आरोपही गिरीजा यांनी केला आहे. या औषधांमुळे त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीत गिरीजा यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबाबतही गंभीर आरोप केले आहेत. पतीकडून दुर्लक्ष, शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. परदेश दौऱ्यादरम्यान झालेल्या वादात त्यांना मारहाण करून उपाशी ठेवण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राऊत कुटुंब अडचणीत आले असून, पोलिस तपासानंतर पुढील तपशील स्पष्ट होणार आहे. सध्या हे सर्व आरोप तक्रारीतील दाव्यांवर आधारित असून, संबंधितांची बाजू समोर आल्यानंतर प्रकरणाला आणखी वळण मिळण्याची शक्यता आहे.

