मास्टर बेडरूममधील बॅगेतून दागिन्यांची चोरी; ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे | प्रतिनिधी
हडपसर परिसरातील एका घराच्या मास्टर बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून सुमारे चार तोळे वजनाचे, ७ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी फिर्यादीच्या घरातील मास्टर बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेतून ७ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सातव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाहेरील कुलपाला किंवा घरातील कपाटाला कोणतीही तोडफोड झालेली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे घरात नियमित ये-जा करणाऱ्या व्यक्तींपैकी कोणीतरी चोरी केली असावी, असा संशय पोलिसांना आला.
चौकशीत फिर्यादीच्या घरी कामासाठी येणाऱ्या अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८, रा. साडेसतरानळी, हडपसर) हिची माहिती समोर आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत पैशांची गरज असल्याने दागिने चोरल्याची कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी तिच्याकडून १५.५५० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी, ९.५५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि १५.८०० ग्रॅम वजनाची रंगीबेरंगी मणी असलेली सोन्याची चेन असा एकूण ७ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील आणि पोलिस हवालदार निलेश किरवे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिसांच्या पथकाने केली.

