पं. विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन
पुणे :
पं. विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रुती संगीत निकेतन (अहिल्यानगर) आणि बालगंधर्व संगीत रसिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारित ‘ऊस डोंगा परी’ या दोन अंकी संगीत नाटकाचा विशेष प्रयोग शुक्रवारी (दि. १० जुलै) रोजी सायंकाळी भरत नाट्य मंदिर येथे उत्साहात झाला. भरत नाट्य संशोधन मंदिरच्या सहकार्याने आयोजित या प्रयोगाला संगीत, नाट्य आणि संतसाहित्यप्रेमी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संत चोखामेळा यांच्या जीवनकार्याचा, सामाजिक समतेच्या विचारांचा आणि भक्तीपरंपरेचा प्रभावी आविष्कार संगीत, अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून या नाटकातून सादर करण्यात आला. अभंग, भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीताचा सुरेल संगम अनुभवत रसिकांनी कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी ज्येष्ठ सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी यांच्या हस्ते पं. विकास कशाळकर यांचा सत्कार करण्यात आला. खासदार डॉ.मेधा कुलकर्णी, अभिनेते राहुल सोलापूरकर,बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे सुरेश साखळकर , भरत नाट्य मंदिरचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे,मधुवंती दांडेकर,दीपक मुजुमले,रुपेश माने,भूपेन शहा, कुणाल बागला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी केले.विजयकांत कुलकर्णी म्हणाले,’ संगीत नाटकात नवीन पिढी पुढे यावी. इतिहास जपला जावा . पं.विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त संगीत नाटकाची परंपरा पुढे जात आहे याचा विशेष आनंद होत आहे’.
या संगीत नाटकाचे लेखन आणि संगीत पं. विकास कशाळकर यांचे असून दिग्दर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी केले. नृत्य दिग्दर्शन कल्याणी कामतकर यांचे होते. शौनक कुलकर्णी, डॉ. ऋषिकेश कुलकर्णी, मोहित मेहेर, संकेत शाह, विशाल काशीद, श्रावण शिंदे, संगीता देऊळगांवकर, अनिकेत देऊळगांवकर, अनुजा कुलकर्णी आणि संत चोखामेळा यांच्या भूमिकेत ओंकार देऊळगांवकर यांनी प्रभावी भूमिका साकारल्या.संगीत साथसंगतीमध्ये मकरंद खरवंडीकर (ऑर्गन), सुपर्ण प्रताप (तबला), शेखर दरवडे (पखवाज), अनुज दरवडे, किरण जोशी (टाळ) आणि शार्दूल खोल्लम (चिपळ्या) यांनी सुरेल साथ देत नाटकाची रंगत अधिक खुलवली.
संत साहित्याचा सांगीतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेल्या या विशेष प्रयोगाने रसिकांवर कायमस्वरूपी छाप पाडली. संत चोखामेळा यांच्या समतेच्या विचारांचा आणि दर्जेदार संगीत नाट्य परंपरेचा प्रभावी संगम या प्रयोगातून अनुभवायला मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

