प्रसाद प्रकाशन आणि विज्ञान भारती यांच्या वतीने ‘प्राचीन शास्त्रे किती खरी’ यावर वादसभेचे आयोजन
पुणे : भारतीय ज्ञानसंपदा ही मौखिक आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपांत समृद्ध आहे. धातुशास्त्र, पर्जन्यशास्त्र, सेंद्रिय शेती, जलव्यवस्थापन, स्थापत्यशास्त्र यांसारख्या विविध ज्ञानशाखा आपल्या पूर्वजांनी विकसित केल्या आणि त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवल्या. मात्र, कालांतराने या समृद्ध ज्ञानपरंपरेचा विसर आपल्याला पडत आहे . नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञानसंपदेला विशेष स्थान देण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र घटक समाविष्ट करण्यात आला आहे. भारतीय ज्ञानसंपदा म्हटली की त्यामध्ये लिखित स्वरूपातील ग्रंथसंपदेसह मौखिक परंपरेतून जतन झालेले ज्ञानही समाविष्ट होते. अनेक पारंपरिक ज्ञानप्रवाह पिढ्यान्पिढ्या मौखिक माध्यमातून पुढे आले आहेत. आपल्या इतिहासातील अनेक घटना आणि पराक्रम पोवाड्यांच्या माध्यमातून जतन झाले असून, हीदेखील भारतीय ज्ञानपरंपरेचीच मौखिक अभिव्यक्ती आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर यांनी व्यक्त केले.
प्रसाद प्रकाशन आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्राचीन शास्त्रे किती खरी’ या विषयावर एस. एम. जोशी सभागृहात वादसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसाद प्रकाशनच्या संचालिका डॉ. उमा बोडस उपस्थित होत्या. वादसभेच्या न्यायाध्यक्षपदी डॉ. नितीन करमळकर होते तर वादसभेत डॉ. माधवी गोडबोले, डॉ. मनीषा पुराणिक, डॉ. मनीष वाळवेकर, डॉ. अंबरीष खरे, श्री. रमेश दाते आणि डॉ. दीप्ती सिधये सहभागी झाले होते.
भारतीय शास्त्रपरंपरा ही केवळ वैराग्य किंवा मोक्ष यापुरती मर्यादित नसून, ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही प्रकारच्या जीवनमूल्यांचा विचार करणारी आहे. आपल्याकडे रसशास्त्र, धातुशास्त्र यांसारख्या अनेक ज्ञानशाखांचे पुरावे उपलब्ध आहेत. आजही त्यांचे भौतिक अवशेष आणि ऐतिहासिक साक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे प्राचीन भारतात या विषयांबाबत प्रगल्भ वैचारिक मांडणी आणि ज्ञानपरंपरा अस्तित्वात होती, याबद्दल शंका नाही. त्या काळातील विद्वानांनी अनेक संकल्पना मांडल्या आणि भविष्यात काय घडू शकते, याचाही विचार केला होता.
मात्र, आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने केवळ वैचारिक मांडणी पुरेशी ठरत नाही. विज्ञान म्हणजे रथाची दोन चाके असल्याप्रमाणे तर्काधिष्ठित गृहीतक आणि त्याची प्रयोगांद्वारे पडताळणी हे दोन्ही घटक आवश्यक असतात. भारतीय प्राचीन शास्त्रांमध्ये अनेक ठिकाणी वैचारिक मांडणी आढळते; परंतु त्या संकल्पनांची प्रयोगाधारित पडताळणी झाल्याचे पुरावे सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा आधुनिक विज्ञानात जसाच्या तशा समावेश करता येत नाही.
हजारो वर्षांपूर्वीची स्थापत्यकला, धातुकाम, जलव्यवस्थापन आणि इतर तांत्रिक उपलब्धी आजही भौतिक स्वरूपात दिसून येतात. यावरून त्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान निश्चितच अस्तित्वात होते. काही ग्रंथ आज उपलब्ध नसल्याने किंवा सर्व नोंदी सापडत नसल्याने त्या काळातील लोकांना हे ज्ञान नव्हते, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. हजारो वर्षांची परंपरा पाहता, या ज्ञानाची नोंद विविध स्वरूपात झालेली असण्याची शक्यता आहे.
आपण असे म्हणू शकत नाही की प्राचीन भारतात विज्ञानातील सर्वच ज्ञान उपलब्ध होते; तसेच काहीच नव्हते, असे म्हणणेही तितकेच चुकीचे आहे. काही क्षेत्रांत आपण निश्चितच अत्यंत प्रगत होतो आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्या उपलब्धींचा स्वीकार करतानाच, विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण पूर्णतः प्रगल्भ होतो, असा दावा करणेही योग्य ठरणार नाही. अशा संतुलित आणि पुराव्यांवर आधारित दृष्टिकोनातून भारतीय ज्ञानपरंपरेकडे पाहण्याची गरज आहे. या बाबी वादसभेत मांडण्यात आल्या.
डॉ. उमा बोडस म्हणाल्या, एखादा विषय समजून घ्यायचा असेल, तर त्याच्या सर्व बाजू समजून घेणे आवश्यक असते. केवळ एखाद्या गोष्टीची माहिती असणे म्हणजे ज्ञान नव्हे. आपल्या भारतीय परंपरेत वाद म्हणजे भांडण नसून प्रश्न मांडणे, तर्क मांडणे आणि शंका उपस्थित करणे होय. अशा चिकित्सक संवादातून सत्य अधिक स्पष्ट होत जाते. त्यामुळे वादसभा ही मतभेद मिटविण्याचे आणि सत्याचा शोध घेण्याचे प्रभावी माध्यम आहे.

