योजनांच्या जनजागृतीसाठी केला चित्ररथ
पुणे, दि. ९ जुलै, २०२६- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरण पुणे परिमंडलाकडून वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची मोफत सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यासाठी महावितरणने दोन वाहनांची व्यवस्था केली असून, यावर महावितरणच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी चित्रफितीही दाखविण्यात येत आहेत.
महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी नुकताच आषाढी वारीच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वारी मार्गाचे व सर्व विसावा स्थळांचे ‘वॉक डाऊन’ सर्वेक्षण करुन विद्युत सुरक्षेची चोख उपाययोजना करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी वारी मार्गावर ठिकठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली असून त्यांना रेडियम असलेले रेनकोट देखील देण्यात आले आहेत.
वाहनांवर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना, स्मार्ट सोलार योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना आदी योजनांच्या तसेच स्मार्ट मीटरचे फायदे सांगणाऱ्या चित्रफिती दाखविण्यात येत आहेत. एकावेळी १०० हून अधिक मोबाईल चार्जिंगला लावण्याची सोयही याच वाहनांमध्ये करण्यात आली आहे. यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे व अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते या चित्ररथांचा शुभारंभ करण्यात आला.

