पुणे -घुंगरांचा नाद, ढोलकीची थाप, लयबद्ध पदन्यास, लावणीतील नजाकत आणि रसिकांच्या ‘वन्स मोअर’च्या गजरात ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात आयोजित सलग १२ तासांचा ‘लावणी महोत्सव’ श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे उत्साहात संपन्न झाला. दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत रंगलेल्या या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत लावणी कलावंतांनी आपल्या बहारदार नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा जागर करणाऱ्या या महोत्सवाला लावणीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विक्रमी लावणी महोत्सवात रोशनी मुंबईकर, वृषाली सातपुते (ही बसली मनात), पूनम कुडाळकर, काव्य पुणेकर (तुमच्यासाठी कायपण), रेश्मा, वर्षा परितेकर, मृणाल शेळके (चाळ माझ्या पायात), शलाका पुणेकर, सोनाली शिंदे (कैरी मी पाडाची), कीर्ती देशमुख, सारिका नगरकर (नखरेली नारी) या नामवंत कलावंत सहकाऱ्यांसह सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी तब्बल १२ तास ठसकेबाज लावणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
प्रारंभी महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांना सर्व लावणी कलावंतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लावणी कलेच्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने आणि कलाविष्काराने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या ज्येष्ठ कलावंतांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.
‘साठी बाजारी जाऊदे मला’, ‘सांगा राया सांगा मी कशी दिसते’, ‘गेली कुठं गावाला’, ‘माझी म्हणू का’, ‘बायी गं तुटली माझी बांगडी’, ‘माझी मैना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’, ‘रात्र धुंदीत ही जागवा’, ‘पैलवान आला हो पैलवान आला’, ‘तुमच्या पुढ्यात कुटते मी’, ‘तुमच्यासाठी जीव झाला वेडा पिसा’, ‘आंबा तोतापुरी’, ‘नाद खुळा’, ‘या रावजी बसा भावजी’, ‘फड सांभाळ तुऱ्याला’, ‘होऊ द्या दमानं’, ‘येऊ कशी तशी नांदायला’, ‘मला म्हणत्यात हो पुण्याची मैना’ आणि ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ अशा अनेक लोकप्रिय लावण्यांनी रसिकांना ठेका धरायला लावला.
‘विचार काय आहे तुमचा पाहुणं’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली’ आणि ‘आजकाल पाटलाचा’ या लावण्यांनाही रसिकांची दाद मिळाली. ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजरेतला घेऊनि अवतरली चंद्रा’ तसेच ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा’ या लावण्यांच्या सादरीकरणाने रंगमंचावर विशेष रंगत आणली. पारंपरिक लावण्यांसोबत गवळणींच्या सादरीकरणानेही रसिकांना मंत्रमुग्ध केले.
‘बुगडी माझी सांडली गं’ या लोकप्रिय लावणीला रसिकांनी ‘वन्स मोअर’ची दाद दिली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ या लावणीनेही प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली’, ‘कान्हा वाजवितो बासरी’, ‘वाजले की बारा’ आणि ‘अप्सरा आली’ या लोकप्रिय गीतांवरील लावण्यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या बैठकीच्या लावणीतील नजाकतदार हावभावांनी लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका उर्वशी’ आणि ‘छत्तीस नखरेवाली’ या लावण्यांनी कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूनि गजरा तुम्हाला मानाचा मुजरा’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी’, ‘बाई माझी करंगळी मोडली’ आणि ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा जुन्या, लोकप्रिय लावण्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
याचबरोबर ‘लावणीसाठी बाजारी जाऊदे मला’ यांसारख्या ठसकेबाज लावण्यांपासून ते जुन्या अजरामर लावण्यांपर्यंत विविध प्रकारच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोककलेचे वैविध्य अनुभवायला मिळाले. प्रत्येक लावणीतील भावमुद्रा, नृत्यांगनांचा पदन्यास, ढोलकीची थाप आणि गाण्यातील आर्जव यामुळे संपूर्ण रंगमंचावर लावणीमय वातावरण निर्माण झाले.
हावभाव, पदन्यास आणि ढोलकीच्या तालाचा सुरेख मेळ साधत नृत्यांगनांनी सलग १२ तास लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली. लोकप्रिय लावण्यांवर मिळालेली ‘वन्स मोअर’ची दाद, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे हा महोत्सव संस्मरणीय ठरला.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. अनेक राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील नामवंत कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हेमंत बागुल आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. लावणी रसिकांनी सारे प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.

