मुख्यमंत्र्यांच्या ‘देख लुंगा’ भाषेवर विरोधक आक्रमक; फडणवीसांवर चौफेर टीका

Date:

‘मिसिंग लिंक’वरील प्रश्नांना धमकीच्या भाषेत उत्तर देणे योग्य नाही; संजय राऊत, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अंजली दमानिया आणि बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

मुंबई | प्रतिनिधी

पावसाळी अधिवेशनात मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प, रस्त्यांवरील खड्डे आणि पावसामुळे उघड झालेल्या पायाभूत सुविधांच्या त्रुटींवरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या कथित ‘भाडे के टट्टू’ आणि ‘देख लुंगा’ या शब्दांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

मुख्यमंत्र्यांची भाषा पदाच्या प्रतिष्ठेला साजेशी नसल्याची टीका करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत : महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज

संजय राऊत यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमधून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. वैफल्य, अहंकार आणि सत्तेचा माज क्षणात उतरू शकतो, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज असल्याचे म्हटले.

सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार आणि झुंडबाजीवर जनतेने बोलू नये, अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे एकप्रकारची आणीबाणी असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

यशोमती ठाकूर : ‘बिनकामाचे सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी लोकशाहीत सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असल्याचे सांगितले. मोठ्या पदावर असलेल्या नेत्यांनी टीका खेळाडूवृत्तीने स्वीकारून कामात सुधारणा करावी; विधानभवनातून धमकीची भाषा वापरू नये, असे त्या म्हणाल्या.

“मुख्यमंत्र्यांची देहबोली पाहता मिसिंग लिंकच्या मुद्द्याचा दणका सरकारला बसल्याचे दिसते. हे बिनकामाचे सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही आणि फडणवीस म्हणजे महाराष्ट्र तर अजिबातच नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

विजय वडेट्टीवार : जनतेचे प्रश्न मांडणे म्हणजे बदनामी नव्हे

विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षाची घटनात्मक भूमिका अधोरेखित केली. रस्त्यांची दुरवस्था, भ्रष्टाचार, विकासातील त्रुटी आणि नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडणे ही विरोधकांची जबाबदारी आहे. अशा प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक बदनामी समजणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी टीका वैयक्तिक पातळीवर न घेता जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.

अंजली दमानिया : आवाज उठवला तर ‘देख लुंगा’?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर आक्षेप घेतला. मिसिंग लिंक प्रकल्पातील त्रुटी राज्यातील जनता पाहत असताना प्रश्न विचारणाऱ्यांना ‘भाडे के टट्टू’ म्हणणे मुख्यमंत्र्यांना शोभते का, असा सवाल त्यांनी केला.

एकेकाळी भ्रष्टाचाराचे मुद्दे विधानसभेत मांडणारे फडणवीस आता प्रकल्पांतील कथित गैरव्यवहारावर आवाज उठवणाऱ्यांना ‘देख लुंगा’ म्हणत असल्याची टीका त्यांनी केली.

बाळासाहेब थोरात : हुकूमशाहीकडे वाटचाल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळातील कामकाज आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. विधानसभा आणि विधान परिषदेचे पीठासीन अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

पुण्यातील मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यानंतर पत्रकारांना छायाचित्रणास प्रतिबंध करण्यात आल्याचा उल्लेख करत, माध्यमांवर निर्बंध आणि प्रश्न विचारणाऱ्यांना धमकावणे हे हुकूमशाहीकडे जाणारे संकेत असल्याचे थोरात म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

विधानसभेत मिसिंग लिंक प्रकल्पावरील टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही जण प्रकल्पाबाबत चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप केला होता. काही तासांत वाहतूक पूर्ववत करण्यात आली असतानाही सात हजार कोटी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र रंगविण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

“मला शिव्या द्या, मी शिव्याप्रूफ आहे; पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. दहा वर्षांनंतर टीका करणारे दिसणार नाहीत, मात्र ही कनेक्टिंग लिंक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने ओळखली जाईल,” असेही त्यांनी सभागृहात सांगितले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या भाषेवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षा उपाययोजनांचे निर्देश

सुरक्षा साधने, कामगारांसाठी सुरक्षित निवास आणि ऑनलाइन नोंदणी बंधनकारक;...

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ नागरिकांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू, आठ जणांचा शोध सुरू

पुणे , दि. ९ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या...

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ‘बघून घेईन’ची भाषा कशी? राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

‘मिसिंग लिंक’, राम मंदिरातील कथित गैरव्यवहार आणि रेल्वे भरतीच्या...

‘मिसिंग लिंक’वरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; प्रकल्पाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याचा आरोप; प्रति किलोमीटर ५४०...