आता नदीतील विसर्ग थांबलेला आहे.
पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण समूहातील पाणीसाठ्यात वाढ होत असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अजूनही मोठी तूट कायम आहे. गुरुवार (दि. ९ जुलै २०२६) रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरणाच्या सांडव्यातून आतापर्यंत 1.51 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मात्र, चारही धरणांतील एकूण पाणीसाठा 16.00 टीएमसी (54.89 टक्के) असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो 19.81 टीएमसी (67.97 टक्के) होता. म्हणजेच,तुलनेत यंदा अद्याप 3.81 टीएमसी पाणीसाठ्याची कमतरता आहे.
चारही धरणांमध्ये मिळून 3,381 एमसीएफटी पाण्याची आवक नोंदविण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आगामी काही दिवसांत पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धरणनिहाय स्थिती
- खडकवासला धरण : पाणीसाठा 1.96 टीएमसी (99.16 टक्के) असून 1,332 एमसीएफटी पाण्याची आवक झाली. धरणातून एनएमआरबीसी कालव्यास 700 क्युसेक आणि पुणे महापालिकेसाठी 500 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धरणाच्या सांडव्यातून आतापर्यंत 1.51 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.
- पानशेत धरण : 6.01 टीएमसी (56.44 टक्के) पाणीसाठा असून 813 एमसीएफटी पाण्याची आवक झाली.
- वरसगाव धरण : 6.70 टीएमसी (52.30 टक्के) पाणीसाठा असून 891 एमसीएफटी पाण्याची आवक नोंदली गेली.
- टेमघर धरण : 1.33 टीएमसी (35.78 टक्के) पाणीसाठा असून 345 एमसीएफटी पाण्याची आवक झाली.
खडकवासला धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून विसर्ग केला असला, तरी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील एकूण साठा अद्यापही गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय कमी आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात होणाऱ्या पर्जन्यमानावरच यंदाच्या हंगामातील जलसाठ्याचे अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे.

