सांडपाणी व आपत्ती व्यवस्थापन अधिक स्मार्ट होणार; सर्व विभागांची संयुक्त बैठक घेणार – स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

Date:

पुणे : मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करून सांडपाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी पुणे महानगरपालिका ‘पॉल्युशन अबेटमेंट ऑफ रिव्हर मुळा-मुठा’ (PARMM) प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक डिजिटल प्रणालींचा अवलंब करणार आहे. त्याचवेळी शहरातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि पाणी तुंबण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही अधिक स्मार्ट, वेगवान आणि समन्वयित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

भिमाले यांनी सांगितले की, मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करणे आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करणे हा PARMM प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाच्या ‘पॅकेज बी-३’ आणि ‘बी-४’ अंतर्गत भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि जलप्रवाह विश्लेषण प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सांडपाणी वाहिन्यांचे नियोजन, देखभाल, तपासणी आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक होणार आहे.

‘बी-३’ पॅकेजअंतर्गत ईएसआरआय आर्कजीआयएस एंटरप्राइज प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यमान सर्व्हरचे उन्नतीकरण, नवीन परवाने, पाच वर्षांचा देखभाल करार आणि अभियंत्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचा समावेश असेल. या प्रणालीमुळे शहरातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, मुख्य मलवाहिन्या, पंपिंग केंद्रे, मॅनहोल, व्हॉल्व्ह आणि इतर अधोसंरचनेचा एकत्रित डिजिटल नकाशा तयार होणार आहे. प्रत्येक मालमत्तेची स्थिती, तपासणीचा इतिहास, देखभाल नोंदी आणि कार्यस्थिती एका व्यासपीठावर उपलब्ध होणार असल्याने निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होईल.

तसेच ‘बी-४’ पॅकेजअंतर्गत बेंटली कंपनीचे ओपनफ्लोज सीवरजेम्स आणि वॉटरजेम्स हे जलप्रवाह विश्लेषण सॉफ्टवेअर खरेदी करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे सांडपाणी आणि जलपुरवठा जाळ्याची संगणकीय प्रतिकृती तयार करून वाहिन्यांवरील ताण, पाणी तुंबण्याची शक्यता, पूरप्रवण भाग, कमी वेगाने वाहणाऱ्या वाहिन्या आणि भविष्यातील वाढत्या मागणीचा परिणाम याचे सखोल विश्लेषण करता येणार आहे. त्याआधारे वाहिन्यांची साफसफाई, गाळ काढणे, दुरुस्ती, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक देखभाल यांचे नियोजन आधीच करता येणार असल्याने अनियोजित बिघाड आणि आपत्कालीन दुरुस्तीची गरज कमी होईल.

दुसरीकडे, शहरातील आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुणे पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा आणि स्मार्ट सिटीच्या सिंहगड रस्त्यावरील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर यांच्या अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक बोलावली जाणार आहे. सर्व यंत्रणांमध्ये अधिक समन्वय निर्माण करून जलद प्रतिसाद व्यवस्था उभी करणे हा या बैठकीचा उद्देश असेल, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.

भिमाले म्हणाले की, शहरातील पाणी साठणाऱ्या ठिकाणांची संख्या, त्या ठिकाणी उपलब्ध पंप, मनुष्यबळ, यंत्रसामग्री, नियंत्रण कक्षाला माहिती मिळण्यास लागणारा कालावधी आणि प्रत्यक्ष प्रतिसाद वेळ याची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. तसेच शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षाशी जोडले आहेत का, किती कॅमेरे कार्यरत आहेत, किती बंद आहेत, नदी-नाले, पूल, चौक आणि पूरप्रवण भागांवर स्वतंत्र देखरेख ठेवली जाते का, याचाही आढावा घेतला जाणार आहे.

याशिवाय नदीपात्रातील पाणीपातळी मोजणारे सेन्सर्स, स्वयंचलित पूर इशारा प्रणाली, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पाणी उपसण्यासाठी स्वतंत्र पथके, कार्यालयनिहाय उपलब्ध पंप आणि मनुष्यबळ याबाबतही तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतरासाठी उपलब्ध शाळा, निवारा केंद्रे, अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छता व्यवस्थेची माहितीही घेण्यात येणार आहे. पोलीस, अग्निशमन, महावितरण, पीएमपीएमएल, जिल्हा प्रशासन आणि हवामान विभाग यांच्यातील समन्वय आणखी प्रभावी करण्यावरही भर दिला जाणार आहे.

भिमाले यांनी सांगितले की, सांडपाणी व्यवस्थापनासाठी जीआयएस-आधारित मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाधारित समन्वयित यंत्रणा उभारल्यास महापालिकेची प्रतिसादक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक शाश्वत, तर आपत्ती व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि परिणामकारक होण्यास मदत होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे, दि. ८ जुलै : राज्य शासनाने मुख्यमंत्री वारकरी...

खड्डे, वॉटर लॉगिंग आणि पालखी तयारीवर भिमालेंचा प्रशासनाला अल्टिमेटम

‘PMC Road Mitra’वरील तक्रारीनंतर ७२ तासांत खड्डे बुजवा; ३९...

पुण्यात रस्ते झाडणकामासाठी ४,७०९ कामगारांची वाढ; ठेकेदारांवर प्रथमच दंडात्मक कारवाई

स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी ठेकेदारांवर; वारंवार हलगर्जीपणा केल्यास ठेका थेट...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा

'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' च्या गजरात आळंदीनगरी दमदुमली पुणे, दि....