‘PMC Road Mitra’वरील तक्रारीनंतर ७२ तासांत खड्डे बुजवा; ३९ पाणी साचणाऱ्या ठिकाणांसाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा
पुणे | प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, पाणी साचणारी संवेदनशील ठिकाणे आणि पुण्यात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांच्या तयारीबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे सांगत, निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘PMC Road Mitra’वर तक्रार करा; ७२ तासांत खड्डे बुजवा
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील डांबर वाहून जाऊन मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे.
नागरिकांनी ‘PMC Road Mitra’ ॲपवर खड्ड्यांची तक्रार नोंदवावी, असे आवाहन भिमाले यांनी केले. पाऊस थांबल्यानंतर संबंधित तक्रारीवर ७२ तासांत कार्यवाही झाली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
प्रमुख रस्त्यांवरील धोकादायक खड्डे तातडीने तात्पुरत्या स्वरूपात बुजवून वाहतूक सुरळीत करावी. त्यासाठी पुरेसा डांबरसाठा, पर्यायी साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि आपत्कालीन यंत्रणा कायम सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पावसाळा संपल्यानंतर शहरातील खराब रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण करण्यासाठी विभागनिहाय आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करून तो नागरिकांसमोर जाहीर करावा, अशी मागणीही भिमाले यांनी केली.
३९ वॉटर लॉगिंग स्पॉट्ससाठी स्वतंत्र अधिकारी
शहरातील ३९ वॉटर लॉगिंग स्पॉट्ससाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही भिमाले यांनी दिले. प्रत्येक ठिकाणी कामाची सद्यस्थिती, कायमस्वरूपी उपाययोजना, आपत्कालीन व्यवस्था आणि काम पूर्ण करण्याची निश्चित मुदत यांचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
मान्सूनपूर्वी वाहतूक पोलिसांनी सूचना दिल्यानंतरही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची गैरसोय वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव राहू नये. स्मार्ट सेन्सर, पंपिंग स्टेशन आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली किती ठिकाणी कार्यरत आहेत, याचा आढावा घ्यावा. संवेदनशील ठिकाणी पाणी उपसण्यासाठी पंप, आवश्यक यंत्रसामग्री आणि आपत्कालीन पथके तत्काळ उपलब्ध ठेवावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वारकऱ्यांच्या आदरातिथ्यात कुचराई नको
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या पुणे मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तयारीचाही स्थायी समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
आळंदी परिसरातील पूरस्थितीमुळे यंदा मोठ्या संख्येने वारकरी पुण्यात दाखल होत असून त्यांच्या मुक्कामाचा कालावधी चार दिवसांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे सुधारित कृती आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश भिमाले यांनी प्रशासनाला दिले.
वारकऱ्यांसाठी निवासव्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाईल शौचालये, स्नानगृहे, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. डासप्रतिबंधक फवारणी, निर्जंतुकीकरण, कचरा व्यवस्थापन, पालखी मार्गावरील रस्ते, खड्डे, पथदिवे आणि वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
“वारकऱ्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही कुचराई होऊ देणार नाही. नागरिक आणि वारकरी यांना सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पूर्ण क्षमतेने काम करावे,” असे भिमाले यांनी सांगितले.

