पुण्यात रस्ते झाडणकामासाठी ४,७०९ कामगारांची वाढ; ठेकेदारांवर प्रथमच दंडात्मक कारवाई

Date:

स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी ठेकेदारांवर; वारंवार हलगर्जीपणा केल्यास ठेका थेट रद्द

पुणे, दि. ८ : शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या तक्रारी, झाडणकामातील अनियमितता आणि ठेकेदारांवरील प्रभावी नियंत्रणाचा अभाव लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने रस्ते झाडणकामाच्या व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी नवीन झाडणकाम प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी ४,७०९ अतिरिक्त कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासोबतच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर प्रथमच दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली असून, वारंवार निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका थेट रद्द केला जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

सध्या पुणे महापालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत झाडणकामाचे कंत्राट दिले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडून हेल्पलाइन, व्हॉट्सॲप, ई-मेल, दूरध्वनी तसेच सामाजिक माध्यमांद्वारे स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी वेळेवर झाडणकाम होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचत असून काही भाग कायमस्वरूपी ‘क्रॉनिक स्पॉट’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.

महापालिकेच्या पाहणीनुसार शहराचा वाढलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, नव्याने विकसित झालेले रस्ते आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे विद्यमान व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे झाडणकामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापुढे हेल्पलाइन, मोबाईल ॲप किंवा इतर माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या सामान्य तक्रारी १२ तासांत, तातडीच्या तक्रारी ६ तासांत आणि अतितातडीच्या तक्रारी २ तासांत निकाली काढणे संबंधित ठेकेदारांना बंधनकारक राहणार आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी झाडणकामाच्या निविदांमध्ये ठेकेदारांवर दंडाची स्पष्ट तरतूद नव्हती. त्यामुळे जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर येत होती. आता मात्र संबंधित परिसरातील स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी ठेकेदारांवर निश्चित करण्यात आली आहे. अतिरिक्त ४,७०९ कामगारांसाठी दरमहा सुमारे १३.७८ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च महापालिका करणार आहे.

सहाव्या चुकीनंतर ठेका थेट रद्द

प्रायोगिक प्रकल्पाच्या पहिल्या महिन्यात दंडातून सूट दिली जाणार असली तरी त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात अस्वच्छता आढळल्यास प्रथम १ हजार, दुसऱ्यांदा २ हजार, तिसऱ्यांदा ३ हजार, चौथ्यांदा १० हजार, पाचव्यांदा ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. सहाव्यांदा संबंधित ठेकेदाराचा ठेका थेट रद्द करण्यात येणार आहे.

झाडणकामासाठी मनुष्यबळ जवळपास दुप्पट

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार शहरातील झाडणकामासाठी पात्र रस्त्यांची एकूण लांबी ६,५०८ किलोमीटर आहे. प्रत्येक ७०० मीटरचा एक बीट गृहीत धरल्यास शहरात ९,२९८ बीट तयार होतात. सध्या ४,८१४ कामगार कार्यरत असून, नव्याने ४,७०९ कामगारांची भरती झाल्यानंतर झाडणकामासाठी उपलब्ध मनुष्यबळ जवळपास दुप्पट होणार आहे.

देखरेखीसाठी स्वतंत्र यंत्रणा

नव्या व्यवस्थेनुसार प्रत्येक २५ कामगारांमागे एक सुपरव्हायझर, आठ सुपरव्हायझरमागे एक गटप्रमुख आणि प्रत्येक प्रभागासाठी एक व्यवस्थापक नेमण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे झाडणकामावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवून शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक स्मार्ट करणार

सर्व विभागांची संयुक्त बैठक घेणार – स्थायी समिती अध्यक्ष...

खड्डे, वॉटर लॉगिंग आणि पालखी तयारीवर भिमालेंचा प्रशासनाला अल्टिमेटम

‘PMC Road Mitra’वरील तक्रारीनंतर ७२ तासांत खड्डे बुजवा; ३९...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा

'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' च्या गजरात आळंदीनगरी दमदुमली पुणे, दि....

शवविच्छेदन गृहांतील त्रुटींवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वेधले शासनाचे लक्ष

शवविच्छेदन केंद्रांमध्ये शीतगृहे, मनुष्यबळ आणि गोपनीयतेवर भर देण्याचे मुख्यमंत्री...