पुणे, दि. ८ जुलै : राज्य शासनाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची प्रशासकीय रचना आणि संचालक मंडळाला अंतिम मान्यता देत सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची पदसिद्ध उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
या संदर्भातील शासन निर्णय आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रसिद्ध केला आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना राज्यातील वारकरी, कीर्तनकार आणि भाविकांना वारीच्या काळात अन्न, निवारा, वैद्यकीय मदत, सुरक्षा, विमा संरक्षण तसेच विविध कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे.
नव्या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय मंत्री हे महामंडळाचे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य मंत्री सहअध्यक्ष तर सामाजिक न्याय राज्यमंत्री
या उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
महामंडळाच्या संचालक मंडळात पुण्याचे विभागीय आयुक्त, समाजकल्याण आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांचे प्रतिनिधी यांचाही समावेश करण्यात आला आहे.
“वारकरी संप्रदायाच्या विविध सुविधा, वारी व्यवस्थापन, तीर्थक्षेत्रांचा विकास आणि वारकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांना अधिक गती देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

