लोककला अनुदान २.२२ कोटींवरून ४.४० कोटींवर; १५ दिवसांत शासन निर्णय – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. ८ : राज्यातील दशावतार, तमाशा, भारूड, शाहिरी, संगीत बारी आदी पारंपरिक लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असून, वाढीव अनुदान थेट कलाकारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
विधानसभा सदस्य निलेश राणे यांनी दशावतार कलाकारांच्या विविध समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर मंत्री शेलार यांनी ही घोषणा केली. चर्चेत सदस्य भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांनीही सहभाग घेतला.
मंत्री शेलार म्हणाले की, कोकणातील दशावतार ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा वारसा असून त्याच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी राज्यस्तरीय समितीचा विस्तार करण्यात आला असून देवेंद्र नाईक, दत्ताप्रसाद शेणई, संतोष रेडकर, राजाराम धुरी आणि शरद मोचेमाडकर यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
कलाकारांच्या खात्यात थेट अनुदान
नव्या धोरणानुसार वाढीव निधीपैकी ५० टक्के रक्कम थेट कलाकारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, तर उर्वरित निधी संबंधित कलापथक चालकांना दिला जाईल. याबाबतचा शासन निर्णय पुढील १५ दिवसांत जारी करण्यात येणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.
नोंदणी आणि ओळखपत्र मोहीम
दशावतार कलाकारांची राज्यभर नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी आणि अधिकृत ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबविणार आहेत.
महोत्सव आणि पुरस्कारांना चालना
दशावतार महोत्सव, नमन महोत्सव तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेंतर्गत दशावतार कलेसाठी तीन लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि एक लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार सुरू राहणार असल्याची माहितीही मंत्री शेलार यांनी दिली.
याशिवाय राज्यातील भारूड, शंकासूर आणि शक्तीतुरा या लोककलांचे विभागनिहाय महोत्सव आयोजित करण्यात येणार असून, भजनी मंडळांना भांडवली साहित्य खरेदीसाठीची अनुदान योजना अधिक व्यापक करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.
‘देव खेळ’ वेब सिरीजवर कारवाईचे निर्देश
‘देव खेळ‘ या वेब सिरीजमध्ये लोकपरंपरेचा विपर्यास झाल्याच्या तक्रारींची दखल घेत संबंधित वेब सिरीजविरोधात पोलिस कारवाई करण्याचे तसेच केंद्र शासनालाही याबाबत कळविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली.
याशिवाय राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेत पात्र दशावतार कलाकारांचा समावेश करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांमार्फत कार्यवाही करण्यात येणार असून, भजनी कलाकारांच्या विविध मागण्यांवर स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

