पुणे | प्रतिनिधी
विशेष गरजा असलेल्या मुलांकडे समाजात अनेकदा दयेच्या भावनेने पाहिले जाते. मात्र, योग्य प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास ही मुलेही स्वावलंबी व आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकतात, हा विश्वास प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे साहस फाउंडेशन गेल्या नऊ वर्षांपासून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे.
सन २०१७ मध्ये सामाजिक कार्यकर्ते सतीश खराडे यांनी स्थापन केलेली साहस फाउंडेशन ही पूर्णपणे ना-नफा तत्त्वावर कार्य करणारी संस्था असून पुणे व मुंबई परिसरातील शेकडो विशेष मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम करत आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट विशेष मुलांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि जीवनकौशल्यांच्या माध्यमातून अधिक सक्षम व स्वावलंबी बनविणे हे आहे.
संस्थेची ३५ सदस्यांची समर्पित टीम विशेष मुलांच्या घरी जाऊन त्यांना शारीरिक तंदुरुस्ती, शरीराचा समन्वय, संतुलन, क्रीडा कौशल्ये, दैनंदिन जीवनातील स्वावलंबन तसेच सामाजिक कौशल्यांचा विकास यासाठी नियमित प्रशिक्षण देते. प्रत्येक मुलाने भविष्यात शक्य तितकी स्वतःची कामे स्वतः करण्यास सक्षम व्हावे आणि पालकांवरील अवलंबित्व कमी व्हावे, या उद्देशाने संस्था सातत्याने कार्यरत आहे.
विशेष मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी साहस फाउंडेशनतर्फे ट्रेकिंग, फील्ड ट्रिप, साहसी उपक्रम, क्रीडा स्पर्धा, समूह उपक्रम आणि विविध कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. सध्या संस्थेत १०० हून अधिक विद्यार्थी नियमित प्रशिक्षण घेत असून ५०० पेक्षा अधिक कुटुंबांना संस्थेने मार्गदर्शन, समुपदेशन आणि विविध प्रकारचा आधार दिला आहे.
या सामाजिक उपक्रमात सहसंचालक मयूर लोणकर, तांत्रिक प्रमुख एकनाथ पाडेकर, सचिव वैभव गायकवाड, विशेष शिक्षिका सोनाली अहिरे, सुचेता पवार तसेच साहस फाउंडेशनची संपूर्ण टीम निस्वार्थ भावनेने योगदान देत आहे.
संस्थापक व संचालक सतीश खराडे यांनी सांगितले की, “विशेष मुलांमध्ये अमर्याद क्षमता आहे. त्यांना केवळ योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि समाजाची स्वीकारार्हता मिळण्याची गरज आहे. प्रत्येक विशेष मुलाला सन्मानाने, स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे जगता यावे, हेच साहस फाउंडेशनचे ध्येय असून त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

