नवी दिल्ली / थिंपू | प्रतिनिधी
भारत सरकारने इथेनॉल मिश्रित E20 (२० टक्के इथेनॉल व ८० टक्के पेट्रोल) वापराला प्रोत्साहन दिल्यानंतर त्यावर देशात विविध स्तरांवर चर्चा सुरू असतानाच, शेजारील भूतानने भारतीय तेल कंपन्यांकडून E20 पेट्रोल स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावा समोर आला आहे.
भूतानी वृत्तसंस्था **’द भूटानीज’**च्या अहवालानुसार, भारतात सामान्य पेट्रोल उपलब्ध असेपर्यंत भूतानला पूर्वीप्रमाणेच इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पुरवठा करावा, अशी विनंती भारताकडे करण्यात आली आहे.
डोंगराळ रस्त्यांवर गाड्यांच्या कार्यक्षमतेची चिंता
भूतानचा प्रदेश पूर्णपणे डोंगराळ आणि चढ-उताराचा आहे. अशा चढणीच्या रस्त्यांवर गाड्यांना चालण्यासाठी जास्तीत जास्त शक्तीची म्हणजेच अधिक ताकदीची गरज असते. भूतानी अधिकाऱ्यांना भीती आहे की इथेनॉल मिसळलेले पेट्रोल डोंगराळ रस्त्यांवर गाड्यांना सामान्य पेट्रोल जेवढी कार्यक्षमता आणि शक्ती देते, तेवढी देऊ शकणार नाही.
भारतात 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलच्या या मिश्रणाला (E20) विरोध होत आहे. विशेषतः 2023 पूर्वी बनवलेल्या पेट्रोल गाड्यांचे मालक चिंतेत आहेत. त्यांचा दावा आहे की या इंधनामुळे गाड्यांचे मायलेज कमी होत आहे, देखभालीचा खर्च वाढला आहे आणि इंजिनचे भाग लवकर खराब होत आहेत. तथापि, भारत सरकारचे म्हणणे आहे की इथेनॉलमुळे मायलेजमध्ये थोडी घट नक्कीच येते, परंतु यामुळे गाडीचा पिकअप आणि इंजिनची कार्यक्षमता सुधारते.
**’द भूटानीज’**च्या अहवालानुसार, भूतानमधील बहुतांश पेट्रोल पंपांवरील भूमिगत इंधन टाक्या जुन्या असून त्यामध्ये पाणी झिरपण्याचा धोका आहे. तज्ज्ञांच्या मते, E20 पेट्रोलमध्ये इथेनॉल असल्यामुळे ते वातावरणातील आर्द्रता आणि पाणी अधिक वेगाने शोषून घेते. त्यामुळे अशा टाक्यांमध्ये इंधनाची गुणवत्ता बिघडण्याची तसेच टाक्या आणि पाइपलाइनला गंज लागण्याची शक्यता वाढू शकते.
याशिवाय, संपूर्ण भूतान हा डोंगराळ प्रदेश असल्याने वाहनांना चढावाच्या रस्त्यांवर अधिक शक्तीची गरज भासते. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतातही E20 पेट्रोलबाबत काही वाहनमालकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेषतः २०२३ पूर्वी तयार झालेल्या काही वाहनांमध्ये मायलेज कमी होणे किंवा देखभाल खर्च वाढण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, E20 मुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास, प्रदूषण घटण्यास आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्यास मदत होईल. तसेच, नवीन वाहनांची रचना E20 इंधन लक्षात घेऊन विकसित केली जात असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
भूतानने भविष्यात इथेनॉलचे प्रमाण वाढवून इंधन पुरवठा करण्याचा निर्णय झाल्यास त्याची आगाऊ माहिती द्यावी, तसेच आवश्यक असल्यास लीक-प्रूफ साठवणूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंतीही भारतीय तेल कंपन्यांकडे केल्याचा दावा संबंधित अहवालात करण्यात आला आहे.

