दोन महिन्यांतच उखडला रस्ता; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, एमएसआरडीसीचे ‘किरकोळ खड्डे’ असल्याचे स्पष्टीकरण
मुंबई | प्रतिनिधी
मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या गुणवत्तेवर पहिल्याच मुसळधार पावसानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे समोर आले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
१ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी झाला असून प्रवाशांकडून सुरुवातीला त्याचे स्वागत करण्यात आले होते. मात्र, दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना, घाट परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही किरकोळ खड्डे पडल्याचे मान्य केले आहे. हे खड्डे तातडीने बुजविण्यात आल्याचा दावा करत महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर टीकेचा भडिमार
मिसिंग लिंकवरील खड्ड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाची गुणवत्ता आणि कामकाजावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्याच पावसात रस्ता उखडल्याचा आरोप करत संबंधित यंत्रणांवर टीका होत आहे.
मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मिसिंग लिंकवर केवळ दोनच ठिकाणी खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. कोणतेही मोठे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या पावसात त्याची ड्युरॅबिलिटी टेस्ट होते. त्यानंतर अंतिम लेअर टाकून आवश्यक सुधारणा केल्या जातात. काही कमतरता निदर्शनास आणून दिल्या तर त्या दूर केल्या जातील; मात्र प्रत्येक वेळी केवळ टीका करणे योग्य नाही.”

