पुणे |
पुणे जिल्ह्यात ३ व ४ जुलै २०२६ रोजी झालेल्या पावसाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केला असून, जिल्ह्यात सरासरी 24.5 मिमी पर्जन्यवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घाटमाथा परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला असून १८ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
सर्वाधिक पाऊस वेल्हे तालुक्यात 90.2 मिमी झाला असून, त्यापाठोपाठ मावळ (64.5 मिमी), मुळशी (55.1 मिमी) आणि भोर (53.2 मिमी) तालुक्यांत चांगली पर्जन्यवृष्टी झाली आहे. पुणे शहरात 27.3 मिमी, खेडमध्ये 30.4 मिमी, हवेलीत 17.3 मिमी तर पुरंदरमध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महसूल मंडळनिहाय पाहता आंबवणे (मुळशी) येथे 146.5 मिमी हा सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला. तसेच वेल्हे मंडळात 166.3 मिमी, कुसूरगाव व लोणावळा परिसरात 87 मिमी, वडगाव मावळ, तळेगाव व ताकोवे बुद्रुक येथे 77.5 मिमी, तर भोर तालुक्यातील भोळवडे येथे 74 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने घाट परिसरासाठी रेड अलर्ट दिला असून, नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख तालुक्यांतील पर्जन्यमान (मिमी)
- वेल्हे – 90.2
- मावळ – 64.5
- मुळशी – 55.1
- भोर – 53.2
- खेड – 30.4
- पुणे शहर – 27.3
- हवेली – 17.3
- पुरंदर – 13.0
- जुन्नर – 10.8
- आंबेगाव – 10.7

