वटपौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेकडून वडाच्या रोपांचे वाटप
पुणे, दि. २८ जून २०२६ :
वटपौर्णिमेच्या निमित्ताने महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सकाळपासून वडाच्या रोपांचे वाटप उत्साहात करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमाला महिलांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अनेक महिलांनी वडाचे रोप स्वीकारत त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून स्वागत करत कौतुक व्यक्त केले.
यावेळी बोलताना महापौर सौ. मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, “एक वडाचे रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली, शुद्ध हवा आणि हरित भविष्यासाठी दिलेली अमूल्य भेट आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.”
शहर अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

