- नांदेड सिटी, मारुंजी, वाघोलीत आयोजन; अधिकाऱ्यांसह जवानांचा सहभाग
पुणे : “आणीबाणीच्या आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवणे अत्यंत गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विविध अग्निशमन केंद्रांमध्ये जवानांनी उत्साहात योगाभ्यास केला,” अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.
‘पीएमआरडीए’च्या नांदेड सिटी, मारुंजी आणि वाघोली येथील अग्निशमन केंद्रांमध्ये विशेष योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. ‘योग करा – निरोगी राहा, सक्षम बना आणि सशक्त समाज घडवा’ हा संदेश देत जवानांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनात, आणि विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, तसेच अग्निशमन केंद्र अधिकारी विजय महाजन यांच्या थेट नियोजनाखाली या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित केंद्रांवरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सामूहिक योगाभ्यास केला. केवळ व्यायाम म्हणून नव्हे, तर निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
अग्निशमन दलातील कर्तव्य हे अत्यंत आव्हानात्मक आणि तणावाचे असते. कोणत्याही क्षणी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जवानांची मानसिक एकाग्रता आणि शारीरिक क्षमता उच्च पातळीवर असणे आवश्यक असते. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून ती निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रभावी जीवनशैली आहे. जवानांच्या कार्यक्षमतेचा तो एक महत्त्वपूर्ण आधार असल्याचे मत यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क
नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या ‘पीएमआरडीए’ अंतर्गत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी ‘पीडीआरएफ’ (PDRF) दलाच्या ९५४५२८२९३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

