पुणे : “ग्रामीण भागातील मुले ही निसर्गतःच विविध कलागुणांनी संपन्न असतात. मात्र, योग्य संधी न मिळाल्यामुळे किंवा त्यांच्यात काहीसा न्यूनगंड असल्यामुळे ती मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहतात. या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आज नितांत गरज आहे. एकदा का त्यांच्यात हा विश्वास जागवला, की ही मुले यशाची उत्तुंग भरारी घेतील. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहायला शिका, सकारात्मकतेने काम करत राहा आणि कायम संवाद ठेवा, आपल्याला यश नक्कीच मिळेल,” असे प्रतिपादन ”लायब्ररी अँड पोस्टकार्ड मॅन’ म्हणून ओळखले जाणारे व रूरल रिलेशनशिपचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी केले.
‘मानव्य’ संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. हा सोहळा रविवारी भूगाव येथील ‘मानव्य गोकुळ’ (माताळवाडी फाटा) संस्थेच्या आवारात अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे उपस्थित होते, तर व्यासपीठावर, सार्थ वेल्थ’चे संस्थापक अरविंद परांजपे, माजी सरपंच शांताराम इंगवले, शशांक वाघ आणि उज्वला लवाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ ‘मानव्य’ संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय विजयाताई लवाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आदरांजली वाहून करण्यात आला.
याच वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘मानव्य’ संस्थेत उभारण्यात आलेल्या नवीन सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन ‘सार्थ वेल्थ’चे संस्थापक अरविंद परांजपे यांच्या हस्ते व
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदीप लोखंडे यांनी ग्रामीण शिक्षण, वाचन संस्कृती आणि डिजिटल सक्षमीकरण या विषयांवर विशेष प्रकाश टाकला. देशभरात ‘पोस्ट कार्ड आणि लायब्ररी मॅन’ म्हणून काम करताना आलेले आपले समृद्ध अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. ते म्हणाले की, आपण सर्वांनी कायम लिहिते राहिले पाहिजे आणि लिहिते राहण्यासाठी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत समृद्ध वाचनालय सुरू करण्याची गरज आहे, कारण आपण वाचू तरच लिहू शकू. जीवनात सकारात्मकतेला आपलेसे केल्यास नकारात्मकता दूर पळते आणि यशाचा मार्ग सुकर होतो, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
परांजपे म्हणाले की, या नवीन प्रकल्पामुळे संस्था ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होईल. ‘मानव्य’ संस्थेमध्ये एक विलक्षण ऊर्जा असून ती मुलांच्या पंखात बळ देऊन त्यांना यशस्वी उड्डाणासाठी मोठे सहकार्य करत आहे, अशा सामाजिक कार्यात सहभागी होता आले याचा आपल्याला मोठा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी ‘मानव्य’ संस्थेच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेतला. संस्थेच्या उभारणीत विजयाताई लवाटे यांचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगत, देवदासींच्या मुलांचे प्रश्न सरकारी दरबारी मांडून त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिल्याचे त्यांनी सांगितले. आज त्यांच्याच प्रेरणेने संस्थेतील मुले केवळ शैक्षणिक प्रगतीच करत नसून स्वतःच्या पायावर उभे राहून आपले संसारही यशस्वीपणे थाटत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यात संस्थेच्या मुलांनी विविध सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमादरम्यान शामकांत सुतार यांनी माऊथ ऑर्गनचे सुंदर वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि भविष्यात संस्थेतील विद्यार्थ्यांना ते विनामूल्य माऊथ ऑर्गन शिकवणार असल्याचे घोषित केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त समीर ढवळे यांनी केले.
‘आत्मविश्वास मिळाल्यास ग्रामीण मुले यशाची उंच भरारी घेतील’ – ‘लायब्ररी मॅन’ प्रदीप लोखंडे
Date:

