कमी पावसाचा अंदाज; पुणे महापालिकेकडून पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना
पुणे, दि. २० जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या मान्सूनबाबत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरात पाणी बचतीसाठी विविध कठोर उपाययोजना लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांच्या स्वाक्षरीने हा कार्यालीन आदेश काढण्यात आला आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशातील हंगामी पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) सुमारे ९० ते ९५ टक्के राहण्याची शक्यता आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने पाणी बचतीचे उपाय तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत
प्रमुख निर्णय
- शहरातील सार्वजनिक व खासगी वाहन धुण्याची (वॉशिंग सेंटर्स) केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश.
- खासगी व सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर बंद.
- महापालिकेच्या उद्यानांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई.
- बांधकामे व रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर प्रतिबंधित.
- सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) वापरणे बंधनकारक.
- पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश.
- अनधिकृत नळजोड व पाणीगळतीवर तातडीने कारवाई.
दंडात्मक कारवाईचा इशारा
महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिक आस्थापनांवर १० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दोन वेळा कारवाई झाल्यानंतरही नियमभंग सुरू राहिल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेने सर्व विभागांना स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले असून पाणी बचतीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

