नांदेड सिटी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे, दि. २० जून : नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत केमिकल कंपनीच्या गोदामातून चोरीस गेलेले लाखो रुपयांचे ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिड अवघ्या तीन तासांत शोधून काढत नांदेड सिटी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धायरी परिसरातील रिलायबल केमिकल्स कंपनीच्या गोदामातून रॅन्केम कंपनीचे ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिडचे १५४ कॅन चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तातडीने तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, शिवाजी क्षीरसागर, मोहन मिसाळ आदींच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित वैभव चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार रोहन इंदुलकर आणि निखिल पवार यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेले १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १५४ अॅसिड कॅन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी पिकअप वाहन जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २० लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.
पोलीस पथकाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे लाखो रुपयांचा माल हस्तगत करण्यात यश आले असून आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

