पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग चा उपक्रम
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्या वतीने आज फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात “पाणी बचाव मोहीम” राबविण्यात आली. या मोहिमेत बिटिया फौंडेशन व गुलाबो गॅंगच्या अध्यक्षा संगिता तिवारी ,मा. मकरंद टिल्लू, पुण्याचे नेते व माजी महापौर अंकुश काकडे, झाशीची राणी संस्थेच्या अध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे , माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे तसेच गौरव गिरीश बापट ,शोभा पणीकर, भारती लोंढे यांनी सहभाग नोंदवून पुणेकर नागरिकांना पाणी बचतीचा संदेश दिला.
सध्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आला असून सध्या फक्त 4.8 TMC पाणी धरणात आहे. पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून पुणेकर नागरिकांनी आणि व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.या पाणी बचाव
मोहिमे दरम्यान फर्ग्युसन कॉलेज रोडवरील विविध रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना भेट देऊन पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात आली. ग्राहकांना विनाकारण पूर्ण ग्लास पाणी देण्याऐवजी आवश्यकतेनुसार किंवा अर्धा ग्लास पाणी देण्याचे आवाहन करण्यात आले. दररोज हजारो लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी पुणेकर नागरिकांना पाणी वाचविण्यासाठी पुढील उपाय सुचविण्यात आले :
पिण्याचे पाणी वाया जाऊ देऊ नका.
गळती होणारे नळ तात्काळ दुरुस्त करा.
वाहन धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळा.
हॉटेल्स व रेस्टॉरंट्सनी पाणी वापराबाबत खबरदारी घ्यावी.
प्रत्येक नागरिकाने “थेंबे थेंबे तळे साचे” या भावनेतून पाणी बचतीत योगदान द्यावे.
पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला आणि घटत्या पाणीसाठ्याला तोंड देण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून पुढील पिढ्यांसाठी जपण्याची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

