मुंबई, 9 जून 2026
देशभरातील पत्रकार, माध्यम व्यावसायिक आणि चित्रपट परीक्षकांकडून प्रचंड संख्येने प्राप्त विनंत्यांचा विचार करून, अतिरिक्त नोंदण्यांची प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीचे (मिफ्फ 2026) माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 10 जून ते 11 जून 2026 या मर्यादित कालावधीसाठी पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या माध्यम प्रतिनिधींना या क्षेत्रातील एका सर्वात गाजलेल्या चित्रपटीय कार्यक्रमासाठी अधिस्वीकृती मिळवण्यासाठी नोंदणीची यापूर्वीची कालमर्यादा गाठता आली नव्हती अशांना नोंदणीसाठी ही विशेष खिडकी सुविधा एक अंतिम संधी उपलब्ध करून देत आहे. मात्र 11 जून 2026 नंतर यासाठी आणखी कालमर्यादा वाढवून मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दिनांक 15 ते 21 जून 2026 या कालावधीत मुंबईत गोपाळराव देशमुख मार्गावरील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) परिसरात आयोजित 19 व्या वर्षीचा मिफ्फ सोहोळा चित्रपट रसिकांसाठी चित्रपट सादरीकरणे, चर्चा, मास्टरक्लासेस, उद्योगांतील महत्वाच्या व्यक्तींशी संवाद तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण असा भरगच्च कार्यक्रम घेऊन येणार आहे.
महोत्सवातील सादरीकरणे, पत्रकार संवाद, माध्यमांवर आधारित विशेष कार्यक्रम यासाठी, माध्यम प्रतिनिधींना पुन्हा खुल्या झालेल्या नोंदणीकरण कालावधीत आपापली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रोत्साहन देण्यात येत आहे.
माध्यम अधिस्वीकृती पोर्टल केवळ 10 आणि 11 जून 2026 या दोन दिवशीच खुले असेल. माध्यमांमध्ये कार्यरत व्यक्तींना मिफ्फ 2026 साठी नोंदणी करण्याची ही शेवटची आणि अंतिम संधी आहे.
नोंदणी प्रक्रियेचे तपशील
माध्यमांच्या प्रतिनिधींना मिफ्फसाठीचे https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx हे अधिकृत संकेतस्थळ अथवा खालील क्यूआरकोड चा वापर करून माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करता येईल.
19 वा मिफ्फ (MIFF) 2026
नॉन-फीचर (बिगर-कथात्मक) चित्रपट निर्मितीला समर्पित असलेला, दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि भव्य चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जाणारा, मिफ्फ (MIFF), अर्थात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन चित्रपट निर्मितीचा एक चैतन्यमय उत्सव म्हणून दीर्घकाळापासून लोकप्रिय ठरला आला आहे. 1990 मध्ये स्थापन झालेला आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत आयोजित केला जाणारा, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ), आज एक प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून विकसित झाला असून, तो जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार आणि चित्रपट प्रेमींना आकर्षित करतो.
19 वा मिफ्फ देखील एक मंत्रमुग्ध आणि समृद्ध करणारा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन घेऊन आला असून, यात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांची चोखंदळपणे निवडलेली मालिका, तसेच उद्योग-केंद्रित उपक्रमांची चित्ताकर्षक श्रेणी समाविष्ट आहे. 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) स्पर्धा विभागासाठी भारतासह 47 देशांमधून 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या महोत्सवात 42 पेक्षा जास्त भारतीय भाषा आणि भारताबाहेरील 30 पेक्षा जास्त भाषांमधील चित्रपट प्रदर्शित होणार असून, ही गोष्ट या महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता दर्शवते. जगभरातील नामवंत चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात काही उत्कृष्ट माहितीपट, लघुपट, अॅनिमेशन, दिग्दर्शकांचे पदार्पणाचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील. चित्रपट प्रदर्शनाबरोबरच, दुसऱ्या ‘डॉक बझार’ मध्ये, समृद्ध करणारे मास्टरक्लासेस आणि आयडीपीए द्वारे आयोजित ‘ओपन फोरम’, या महोत्सवातील सिनेमॅटिक आणि सर्जनशील आदान-प्रदान आणखी वाढवतील.
चला तर, मिफ्फ 2026 मध्ये कथाकथनाच्या चैतन्यमय विश्वात प्रवेश करूया, आणि प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि प्रेरणादायी स्वरांनी एकत्र येऊन साकारलेल्या माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट निर्मितीच्या अविस्मरणीय सोहळ्यात सहभागी होऊया.
19 व्या मिफ्फ साठी माध्यम मान्यता धोरण पुढील लिंकद्वारे पाहता येईल: link

