मुंबई,: आयुष्यातील काही क्षण असे असतात, जे सगळंच बदलून टाकतात… आणि जर त्या क्षणासोबत मृत्यूची चाहूल जोडली गेली, तर? अशाच रहस्य, भावना आणि अनपेक्षित घटनांनी भरलेली ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही बहुचर्चित मराठी वेब सिरीज २९ मे २०२६ पासून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
प्रदर्शनापूर्वीच आपल्या थरारक ट्रेलरमुळे चर्चेत आलेल्या या वेब सिरीजची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता ही सिरीज प्रेक्षकांना रहस्य, मानसिक संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यांचा वेगळाच अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘८ वाजून १३ मिनिटे’मध्ये एका साध्या आणि प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे निर्माण होणारा तणाव, नात्यांमधील बदल आणि वाढत जाणारे रहस्य प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. प्रत्येक भागामध्ये सस्पेन्ससोबतच मानवी भावनांचीही तीव्रता जाणवते, त्यामुळे ही सिरीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

‘सौभाग्यवती सरपंच’, ‘आयपीसी’, ‘राख’ आणि ‘खोताची वाडी’ यांसारख्या वेगळ्या आशयाच्या ओरिजिनल्सनंतर ‘अल्ट्रा झकास’ पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि हटके कंटेंट घेऊन आले आहे. या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकत असून, त्यांच्या दमदार अभिनयाची विशेष चर्चा होत आहे.
दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या वेब सिरीजमध्ये शरद पोंक्षे, उदय सबनीस, संजीव जोटांगिया आणि विनीत शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.
रहस्य आणि भावनिक नाट्य यांचा उत्तम समतोल साधणारी ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही वेब सिरीज आता ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.

