पुणे.दि.३०: हडपसरमधील पांढरे मळा परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी केवळ दारूबंदी नव्हे तर व्यसनमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलणे अधिक गरजेचे असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
डॉ. गोऱ्हे यांनी आज घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राहुल क्षीरसागर, अरुण डाडर, अशोक चव्हाण आणि विजय शर्मा यांच्या कुटुंबीयांना शिवसेना पक्ष व डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने रोख व धनादेश स्वरूपात आर्थिक मदतही देण्यात आली. याप्रसंगी, नाना भानगिरे, मारुती आबा तुपे, दत्ता खवले, संदीप शिंदे, मोहित काकडे, मयुरी बामणे, निशा थोरात यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, मृत व्यक्तींचे कुटुंबीय बहुतांश असंघटित क्षेत्रातील असल्याने प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनांचा तातडीने लाभ मिळावा, कुटुंबातील इतर सदस्यांना स्वावलंबी करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच रुग्णालयाकडून झालेल्या कथित दिरंगाईची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई व्हावी, असेही त्यांनी म्हटले. “रुग्णाला तातडीने उपचार मिळण्याऐवजी आर्थिक बाबींना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे काही रुग्णांना वेळेत मदत मिळू शकली नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुणे महापालिकेनेही मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी सूचना आपण महापौर मंजुषा नागपुरे यांना दूरध्वनीवरून केली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारही या प्रकरणात संवेदनशील असून योग्य ती मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भरवस्तीत अवैध दारू सहज उपलब्ध असणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “केवळ पोलिसांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. स्वस्त दारूच्या मोहापोटी नागरिक अशा हातभट्ट्यांकडे वळतात. त्यामध्ये घातक रसायने मिसळली जात असल्याने जीवितहानी होते. त्यामुळे अवैध दारूविक्री रोखण्याबरोबरच व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”
“जे लोक अशा हातभट्ट्यांवर जातात त्यांनीही आपल्या कुटुंबाचा विचार करणे गरजेचे आहे. दारूबंदीपेक्षा व्यसनमुक्तीचा मार्ग समाजासाठी अधिक परिणामकारक ठरू शकतो,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

