: भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे मोहिनीअट्टम नृत्य कलेवर कार्यशाळा
पुणे: काळाबरोबर कलेमध्ये बदल होत असतात. त्याचप्रमाणे मोहिनीअट्टम या कलेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बदल घडले आहेत. ही कला प्रामुख्याने दरबारी कला म्हणून ओळखली जात होती. तामिळनाडू आणि केरळ मधील अनेक मंदिरांमध्ये आजही मोहिनीअट्टम कलेच्या परंपरा दिसून येतात. मोहिनीअट्टम ही कला केवळ दक्षिणात्य लोकांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या कलेचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. ही कला अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी या कलेमध्ये अधिक संशोधन झाले पाहिजे,असे मत ज्येष्ठ मोहिनीअट्टम नृत्यगुरु डॉ. दीप्ती भल्ला यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे डॉ. दीप्ती भल्ला यांच्या मोहिनीअट्टम नृत्य कलेवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोहिनीअट्टम या कलेचा प्रवास उलगडून सांगितला. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे संचालक डॉ.शारंगधर साठे, भारती विद्यापीठ निवृत्त उपकुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता चापेकर, डाॅ. देविका बोरठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. दीप्ती भल्ला यांनी मोहिनीअट्टम नृत्य शैलीतले बारकावे उपस्थितांना सांगितले.
डॉ. दीप्ती भल्ला म्हणाल्या, नृत्य, नाट्य, संगीत या केवळ कला नाही तर जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कला ही माणसाचे जीवन अधिक सुंदर करते. मोहिनीअट्टम अशाच प्रकारची एक कला आहे या कलेवर अधिकाधिक संशोधन करून ती कला तरुणांपर्यंत पोहोचविली पाहिजे.
डॉ. सुचेता चापेकर म्हणाल्या, नृत्य हे एक प्रकारे संगीताचे दृश्य माध्यम आहे. मोहिनीअट्टम ही कला इतर दाक्षिणात्य नृत्याच्या तुलनेत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. ही कला विविध माध्यमातून लोकांपर्यंत आणि विशेषतः तरुण कलाकारांपर्यंत पोहोचली पाहिजे.
डॉ. शारंगधर साठे म्हणाले, दिग्गज कलाकारांचा विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलेतील वाटचाल योग्य दिशेने करता येते. इतर दाक्षिणात्य नृत्यकलेप्रमाणेच मोहिनीअट्टम नृत्य प्रकारावर आधारित अभ्यासक्रम संस्थेमध्ये लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
डॉ.एस.एफ. पाटील म्हणाले, कोणतीही कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यामुळे कलाकारांना वैयक्तिक आयुष्यातही अतिशय मदत होते. नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये कलेला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे तरुण कलाकार घडतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकेल, यासाठी भारतीय विद्यापीठ अनेक वर्षांपासून कटिबद्ध आहे.