जलसंपदा मंत्रिपद मिळणार
पुणे-शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे जयंत पाटीलही लवकरच अजित पवार गटात सामील होऊन सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लवकरच आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता शरद पवार यांची साथ सोडणार आहे. हा बडा नेता म्हणजे जयंत पाटीलच असल्याचे बोलले जात आहे. या नेत्यासोबत राष्ट्रवादीचे जालना, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे तीन आमदार असतील. शरद पवार गटाचे हे चार आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर प्रवेश करतील. मंत्रिमंडळ विस्तारात यातील एका बड्या नेत्यास कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. जलसंपदा मंत्रिपद हवे, अशी अट या मंत्र्यांने घातली असून ती मान्य झाल्याचे सांगण्यात येते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अमित शहांची भेट घेण्यापूर्वी अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला होता. यावेळी त्यांना अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी बोलावले होते. त्यानंतर जयंत पाटील व अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, जयंत पाटील व अमित शहा यांच्या भेटीबाबत अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 4 विद्यमान आमदार अजित पवार गटासोबत येणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. तसेच, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या आगेमागे हा मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होईल. त्यामध्ये 6 भाजपला, 4 शिंदेसेनेला आणि 4 राष्ट्रवादीला मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.