पुणे- सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पुण्यात आले आहेत. यावेळी बोलताना अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबाबत अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यादा पुण्यात आलो आहे. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसलो आहे. मी पवार यांना सांगू इच्छीतो की खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. तुमच्यासाठी हीच जागा योग्य होती, पण तुम्ही उशिर केलात,’ असं अमित शहा म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ चा शुभारंभ अमित शाहांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अमित शहा कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी अजित पवारांबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच पुण्यात आलोय आणि पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आहोत. दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला.’ अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी नमस्कार करत प्रतिसाद दिला. अमित शाह पुण्यात येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
सहकार विभागाचे संपूर्ण पोर्टल आपण आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीकडेचा संकल्प घेतला आहे. मोदी यांनी 9 वर्षात देशातील 60 कोटी गरीब लोकांना सहकार क्षेत्रातून मदत केली आहे. गरीबांच्या प्राथमिक गरजा असतात. त्यांच्या इच्छा गेल्या 70 वर्षात पूर्ण झाल्या नव्हत्या. पण, पंतप्रधान मोदी यांनी फक्त 9 वर्षात सगळं काम एकाच क्षणात करुन टाकलं आहे. गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा मोदींनी पूर्ण केल्या आहेत, असं अमित शाह म्हणाले.
गुजरात मधील 36 लाख महिला 100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करुन 60 हजार कोटीचा फायदा ‘अमुल’च्या माध्यमातून कमावत आहेत. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गरिबाला एक व्यासपीठ मिळावं यासाठी सहकार खातं निर्माण केलं गेलंय. विशेष म्हणजे एकट्या महाराष्ट्रात 42 टक्के सहकारी संस्था आहेत. एकीकडे देश तर एकीकडे महाराष्ट्र असं चित्र आहे, असं म्हणत शाह यांनी राज्याचं कौतुक केलं. सहकार विभागाचं काम संगणीकृत केलं जाणार आहे. त्यासाठीच डिजिटल पोर्टल आणलं जात आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आवश्यक आहे, त्यासाठीच हा प्रयत्न असल्यातं शाह म्हणाले.