पुढच्यावेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री; मविआत करार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
पुणे-काँग्रेसला दिलेला एक मत धर्मांतर विरोधी कायदा रद्द करते, काँग्रेसला दिलेले एक मत गो हत्या बंदी कायदा रद्द करते, याचे उत्तम उदाहरण कर्नाटक मध्ये दिसून आले असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच पुढच्यावेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील, असा करार महाविकास आघाडीमध्ये करण्यात आला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या करारानुसार उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदार हरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतला, असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.पुणे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहितेची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना दिली, यावेळी ते बोलत होते. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
जनतेला कायम कन्फ्युज करून ठेवण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी केले आहे. सरकार जनतेच्या हितासाठी असते हे कधीच काँग्रेस पार्टीने जनतेला कळू दिले नाही. धर्माधर्मात समाज-समाजात वाद लावण्याचे काम काँग्रेसने केले, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
शरद पवार यांनी कायमच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता व्यक्त केली, त्यामुळे समाजातील वातावरण खराब झाले, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी कायम समाजात तेढ निर्माण करणारे ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटनंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन समाजातील वाद झाले. त्याच्या फक्त दोन दिवसानंतर बंटी पाटील यांनी कोल्हापुरात असेच वक्तव्य केले. त्यानंतर दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकारणात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे राहिला आहे, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.