पुणे दि.१५: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्याच्या स्ट्राँग रूमला भेट दिली आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेची तसेच मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रियेची पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व्हावी यादृष्टीने खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया आज सुरु झाली. पोटनिवडणूकीसाठी थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सर्व मतदान यंत्रे आणण्यात आली आहेत. याठिकाणी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या विशेष उपस्थितीत आज सकाळी कमिशनिंग प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मतदान यंत्राच्या कमिशनिंग प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधिताना सूचना दिल्या. तसेच मतदान केंद्र क्रमांक ६१ च्या सर्व कमिशनिंग प्रक्रियेची तपासणी आणि खात्री करून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वतः या केंद्राची मतदान यंत्रे सीलबंद (ईव्हीएम सिलिंग) केली.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कसबा पेठ मतदारसंघात भेट
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी एफसीआय गोदाम येथील स्ट्राँगरूमचीदेखील पाहणी केली. त्यांनी ईव्हीएम यंत्र जोडणी (पेअरींग) प्रक्रीयेची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कसबा पेठ मतदारसंघात मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ पूर्ण झाल्यानंतर बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे पेअरींग सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया करताना विशेष खबरदारी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यांनी निवडणूक संदर्भातील इतर व्यवस्थेचाही आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, समन्वयक अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ-बारटक्के आदी उपस्थित होते.