पुणे, दि. १३: जुन्नर-आंबेगाव उपविभागाच्या मंचर येथील कार्यालयात महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी आयोजित केलेल्या विशेष लोक अदालतीत १६४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे, अशी माहिती उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
या विशेष अदालतीत जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनिस, आंबेगावचे प्रभारी तहसिलदार अनंता गवारी, जुन्नर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. गाडेकर, आंबेगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. गावडे, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील अनेक विधिज्ञ व प्रकरणातील पक्षकार अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या विशेष लोक अदालतीत ६९० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी काही प्रकरणांमध्ये तडजोड केली तसेच काही प्रकरणी लेखी युक्तीवाद दाखल करुन प्रकरण निर्णयासाठी ठेवण्यासाठी पक्षकारांनी मागणी केली. यावेळी दोन पक्षकारांनी दाखल केलेल्या दाव्यामध्ये तडजोड झाल्याने त्यांनी दाखल केलेला दावा पुढे सुरू ठेवायचा नाही असे सांगून अपील कामकाजातून निकाली काढावे म्हणून लेखी विनंती अर्ज दिला. त्यांच्या या सामंजस्याची दखल घेत सर्व गुबालपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या अदालतीमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ व पक्षकार यांनी प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.