पुणे, दि. ६ मे २०२४: महावितरणच्या राज्यभरातील २५ लघु प्रशिक्षण केंद्रांच्या सन २०२३-२४ च्या कार्य मूल्यमापनाचा अहवाल नुकताच जाहीर झाला. यात पुणे परिमंडलाच्या लघु प्रशिक्षण केंद्राने सलग दुसऱ्या वर्षी तब्बल १८४ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. नागरिक, विद्यार्थी, विविध एजन्सीजचे कर्मचारी यांच्यासह महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रबोधन व जनजागृतीसाठी पुणे परिमंडलाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महावितरण अंतर्गत नाशिक येथील मुख्य प्रशिक्षण, संशोधन व सुरक्षा विभाग अंतर्गत राज्यात २५ ठिकाणी लघु प्रशिक्षण केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांद्वारे अभियंता, अधिकारी तसेच नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण देणे, कार्यशाळांचे आयोजन करणे तसेच नागरिकांना वीजसुरक्षेसह विविध योजनांबाबत प्रबोधन करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाते.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी प्रशिक्षणाला मोठा वेग दिला आहे. त्यानुसार लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी गेल्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल १४९ प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. यामध्ये राज्यात सर्वाधिक ५३ हजार ७०० अभियंता, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांशी थेट संवाद साधून वीजसुरक्षेसह विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षण केंद्राने दिलेले उद्दिष्ट पुणे लघु प्रशिक्षण केंद्राने १८४ टक्के पूर्ण करीत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासाठी मुख्य महाव्यवस्थापक श्री. दत्तात्रेय बनसोडे (नाशिक) यांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले.
सन २०२३-२४ मध्ये पुणे परिमंडलातील ४ हजार ६१२ अभियंते, अधिकारी तसेच नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच मीटर रीडींग, सौर ऊर्जा एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये विद्युत सुरक्षा, उपकेंद्र व वितरण यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, अॅडव्हान्स मीटरींग इन्फ्रास्ट्रक्चर, सौर ऊर्जा, विद्युत वाहने, वीजचोरी रोखण्याच्या उपाययोजना, प्रथमोपचार, ताणतणाव व्यवस्थापन, वीजबिलांचे अचूक बिलींग आदींचा समावेश आहे. तसेच घरगुती व सार्वजनिक वीजसुरक्षा, डिजिटल ग्राहकसेवा, वीजबचत आदींबाबत शहरी व ग्रामीण भागात मेळावे, पथनाट्य, शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण वर्गांद्वारे नागरिक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. सोबतच महावितरण व पुण्यातील ३२ विद्युत अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात ज्ञानाचे आदानप्रदान अंतर्गत सामंजस्य करार झाले आहेत. या विद्युत अभियांत्रिकीच्या ९ हजार ५०० विद्यार्थांशी थेट संवाद साधून वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी, वीजसुरक्षा व डिजिटल ग्राहकसेवा आदींबाबत ‘नॉलेज शेअरींग’ करण्यात येत आहे.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – ‘वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे, त्यांचे ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्याचा पुणे परिमंडलातील लोकाभिमुख व गतिमान कामकाजासाठी फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात प्रशिक्षणांचा वेग व विषयांची व्याप्ती वाढविण्यात आली’.