पुणे दि. १३: केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲप आधारित ॲग्रीगेटर्स कंपन्यांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असून त्याविषयी नागरिकांनी आपले अभिप्राय कळवावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.
ॲप आधारीत वाहनांसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सुचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चक नियमावलीचा मसूदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले अभिप्राय dvcommr.enf1@gmail.com या ई-मेलवर अथवा संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्षरित्या २० मे २०२३ पर्यंत सादर करावेत. प्राप्त मते व अभिप्राय विचारात घेऊन सूचना अंतिम करण्याविषयी शासनातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.